पुणे : नवले पूल अपघाताबाबत आज होणार खुलासा | पुढारी

पुणे : नवले पूल अपघाताबाबत आज होणार खुलासा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नवले पूल परिसरातील अपघातानंतर तब्बल पाच दिवस गुलदस्त्यात असलेला आरटीओचा अहवाल आज गुलदस्त्यातून बाहेर पडणार आहे. कारण, आरटीओ अधिकाऱ्यांनी हा अहवाल नुकताच सिंहगड रोड पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. त्यामुळे नवले पूल परिसरातील भुमकर चौकात झालेल्या 48 वाहनांचा अपघात कशामुळे झाला, हा अपघात होण्यामागे काय कारण होते, यात कोण दोषी आहे, हे आता स्पष्ट होणार आहे.

प्रत्येक वाहनाचा अपघात झाला तर त्याची तपासणी करून त्याबाबतचे तांत्रिक कारणाचे स्पष्टीकरण करण्याचे काम आरटीओ अधिकाऱ्यांचे असते. आरटीओ अधिकारी अपघात झालेल्या वाहनाची पाहणी करून त्या संदर्भातील अहवाल संबंधित पोलिसांच्या स्वाधीन करतात. या अहवालात अपघाताची कारणे, वाहनाची स्थिती याबाबत माहिती दिलेली असते. त्यानंतर हा अहवाल कोर्टासमोर सादर केला जातो. असाच अहवाल आरटीओकडून नुकताच सिंहगड रोड पोलिसांना प्रस्तुत करण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच या अपघाताबाबत खुलासा होण्याची शक्यता आहे.

एकदमच 48 वाहनांचा अपघात झाल्यामुळे प्रत्येक वाहनाची तपासणी करून आणि घटनास्थळाची पाहणी करून आरटीओला अहवाल तयार करण्यासाठी तब्बल पाच दिवस लागले आहेत. गुरुवारी रात्री हा अहवाल तयार करण्यात आला असून, आता तो सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे प्रस्तुत करण्यात आला आहे, या अहवालात काय आहे, अपघातात दोषी कोण आणि अपघात कशामुळे झाला, याची उत्सुकता पुणेकर नागरिकांना लागली आहे

Back to top button