पिंपरी : कोरोना बाधितांचे प्रमाण 19 टक्क्याने घटले | पुढारी

पिंपरी : कोरोना बाधितांचे प्रमाण 19 टक्क्याने घटले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधितांचे गेल्या आठवडाभरातील प्रमाण 19 टक्क्याने घटले आहे. 9 ते 16 नोव्हेंबरदरम्यान 95 बाधित रुग्ण आढळले होते. तर, 16 नोव्हेंबरपासून आजअखेर 77 बाधित रुग्ण आढळले आहेत.

रुग्णसंख्या नियंत्रणात

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सध्या नियंत्रणात आली आहे. बुधवारी (दि. 23) 11 बाधित रुग्ण आढळले. तर, 24 रुग्ण उपचारानंतर बरे झाले. शहरामध्ये गेल्या 23 दिवसांमध्ये 335 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, याच कालावधीत 362 रुग्ण बरे झाले आहेत.

आठवडानिहाय रुग्णसंख्येचा घटता आलेख

शहरामध्ये 1 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत 163 बाधित रुग्ण आढळले होते. 9 ते 16 नोव्हेंबर दरम्यान 95 बाधित रुग्ण आढळले. तर, 16 ते 23 नोव्हेंबर दरम्यान 77 बाधित रुग्ण आढळले. नोव्हेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यापासून तिसर्‍या आठवड्यापर्यंत कोरोना बाधित रुग्णसंख्येचा आलेख कमी होत गेला आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.93 टक्के

शहरात आजअखेर एकूण 3 लाख 72 हजार 645 बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 3 लाख 68 हजार 669 रुग्ण बरे झाले. म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.93 टक्के इतके आहे.

Back to top button