निमोणे : घराण्याच्या लौकिकाला साजेसे काम करणार :  घोडगंगाचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांचे मनोगत | पुढारी

निमोणे : घराण्याच्या लौकिकाला साजेसे काम करणार :  घोडगंगाचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांचे मनोगत

निमोणे; पुढारी वृत्तसेवा : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ऋषिराज पवार यांची झालेली निवड हे तसे धक्कातंत्रच म्हणावे लागेल! आमदार अशोक पवार काही काळ कारखान्याचे नेतृत्व करतील आणि त्यानंतर ऋषीराज यांच्या खांद्यावर कारखान्याची धुरा सोपवतील हीच सगळ्यांची अटकळ होती…मात्र अध्यक्ष निवडीत अनपेक्षितपणे ऋषिराज यांचे नाव पुढे आल्याने हा सगळ्यांसाठी धक्का होता.

पुण्या-मुंबईमध्ये शिकलेले, बालपण सगळे शहरी भागात गेलेले उच्चशिक्षित कारखान्याच्या अध्यक्षपदी आल्याने कुतूहल तर राहणारच ना? नवीन अध्यक्ष कशा पद्धतीने कारखाना चालविणार या जिज्ञासापोटी शुक्रवारी (दि.18) सकाळी दहा-साडेदहाच्या दरम्यान थेट घोडगंगा कारखाना गाठला …नवीन चेअरमन आलेत का, कामगारांकडे चौकशी केली तर उत्तर मिळाले अध्यक्षसाहेब सकाळी साडेसातपासून कारखान्याची पाहणी करताहेत…निरोप पाठवला अन् अवघ्या पाच मिनिटांत कारखाना वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांसह अध्यक्षांनी कार्यालयात प्रवेश केला….आणि सुरू झाली मुलाखत

प्रश्न : तुमचे वडील आणि आमदार अशोक पवार हेच अध्यक्ष होतील अशी सगळ्यांची धारणा असताना, अनपेक्षितपणे तुमची निवड झाली!
उत्तर – विश्वास ठेवा हा माझ्यासाठीसुद्धा धक्का आहे. आमदार अशोक पवार माझे वडील असले तरी या निवडीबद्दल एका शब्दानेही त्यांनी मला कल्पना दिली नव्हती.

प्रश्न- ऐन तारुण्यात एवढ्या मोठ्या संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, आनंद होत असेल.
उत्तर- खरं सांगू का, हे सगळेच माझ्यासाठी खूप अनपेक्षित आहे. सहकारमहर्षी माझे आजोबा रावसाहेबदादा, माझे वडील आमदार अशोक पवार यांनी रक्ताचे पाणी करून हा कारखाना नावारुपाला आणला. आज साखर कारखानदारी प्रचंड अडचणीत आहे. सरकारची धोरणे जागोजागी सहकाराची अडवणूक करणारी आहेत, अशा प्रतिकूल परिस्थितीतून आपल्याला वाटचाल करायची आहे. आज संधी मिळाली आहे, पण आमच्या घराण्याचा लौकिक हा लोकसेवेचा आहे आणि त्या लौकिकाला साजेल अशा पद्धतीचे काम माझ्या हातून सतत घडत राहो यादृष्टीने मी प्रयत्न करत राहील.

प्रश्न – कारखान्याच्या कर्जबाजारीपणाचा मुद्दा निवडणुकीत खूप गाजला ?
उत्तर – विरोधकांनी कर्ज हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा केला होता. मात्र घोडगंगा अडचणीत कुणी आणला, भाजप सरकारने को-जनरेशनचा प्रश्न चिघळत ठेवल्याने कारखाना अर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आणि सभासदांना याची कल्पना असल्यामुळेच विरोधकांच्या अपप्रचाराला यश आले नाही.

प्रश्न – कारखान्याचे पत्रे फुटले हाही मुद्दा खूप गाजला.
उत्तर – होय, पत्रे फुटले, हे बरोबर आहे. पण
आम्ही पत्रे कुजेपर्यंत वापरले, हे समजून घ्या. संस्थेच्या विकासासाठी भौतिक बाबींवर काटकसर करूनच संस्था चालवल्या पाहिजेत…आता तुम्ही पाहा विरोधक प्रचार सभांमध्ये सांगत होते, आम्ही तीन हजार रुपये बाजारभाव देऊ ! पण देणार कसा, त्याचे गणित काय, काहीच उत्तर नव्हते, सवंग लोकप्रियतेसाठी भाषण ठोकून आर्थिक गणित नाही जमवता येत, जो सभासद घाम गाळून ऊस पिकवतो, त्याच्या उसाचे व्यवस्थित गाळप करायचे असेल तर कारखान्यातील यंत्रसामग्री व्यवस्थित लागते आणि आम्ही सातत्याने या विषयाला महत्त्व दिले.

प्रश्न – भविष्यात कारखान्यात काय बदल झालेले दिसतील आणि दराबाबत काय चित्र असेल.
उत्तर – कारखान्यात आधुनिकीकरण करण्यावर आमदार अशोक पवार यांनी खूप वर्षांपूर्वीच सुरुवात केली आहे. काटकसर करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल, उपपदार्थ, को- जनरेशन या सगळ्या गोष्टी पूर्ण क्षमतेने चालवून भविष्यात कारखान्याचे विस्तारीकरण करत असताना सवंग लोकप्रियेतेसाठी ऋण काढून आम्ही कधीच सण करणार नाही, 18 हजार सभासदांची ही कामधेनू मोठी झाली पाहिजे यासाठी आमच्या तीन पिढ्या झटत आहेत.

प्रश्न – निवडणुकीसाठी तुम्ही कामगार वापरता.
उत्तर – चूक ! जवळजवळ 80 टक्के कामगार हे घोडगंगाचे सभासद आहेत. या सगळ्या कामगारांच्या वाडवडिलांनी रावसाहेबदादांच्या खांद्याला खांदा देऊन कारखान्याच्या उभारणीला हातभार लावला आहे. संस्थेच्या हितासाठी कामावर नसताना त्यांनी काही भूमिका घेतली, आमच्यासाठी पै-पाहुण्यांकडे शब्द टाकला तर याला तुम्ही काय म्हणाल, विरोधकांनी निवडणूक काळात गलिच्छ राजकारण करत कामगारांवर थेट वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेकडून दबाव टाकले गेले.

Back to top button