पारगाव परिसरात बिबट्या आणि बछड्याचा वावर | पुढारी

पारगाव परिसरात बिबट्या आणि बछड्याचा वावर

नानगाव; पुढारी वृत्तसेवा : पारगाव सा.मा. (ता. दौंड) येथील लिप्ट वस्ती परिसरात बिबट्यासह एका बछड्याचा वावर असल्याची माहिती शेतकरी विकास देशपांडे यांनी वनविभागाला दिली आहे. वनविभागाने तत्काळ परिसरात पाहणी केल्याची माहिती वनरक्षक एन. सी. चव्हाण यांनी दिली. लिप्ट वस्ती परिसरात ऊसतोडणीसाठी मजूर व त्यांच्या बरोबर लहान मुलेही आलेली आहेत.

तसेच शेती करणारे कुटुंबही याच भागात राहतात. शेतात बिबट्या व बछड्याचे दर्शन होत असून शेतातून त्यांचा गुरगुरण्याचाही आवाज येत आहे, अशी माहिती वनविभागाला कळविण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी दौंड कल्याणी गोडसे, वनरक्षक एन.सी.चव्हाण, वनरक्षक शिवकुमार बोंबले, सचिन पुरी, वनमजुर रमेश कोळेकर, सुरेश पवार यांनी संबंधित शेती परिसरात पहाणी केली. परिसरात ऊसतोडणीमुळे शेतात सर्वत्र पाचट पडले असल्याने बिबट्या व बछड्याच्या पायाचे ठसे कोठेही आढळून आले नाही, असे वनविभागाने सांगितले.

मजूर, शेतकरी, ग्रामस्थांना दक्षतेचे आवाहन
गेली अनेक वर्षांपासून बिबट्यांचा वावर आढळून येत आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्या व बछडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ऊसतोडणीमुळे बिबटे आश्रयासाठी जात असतील तर ऊसतोडणी कामगार यांनी स्वतः व लहान मुलांवर लक्ष ठेवावे, शेतकरी व परिसरातील नागरिकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहनही वनविभागाने केले आहे.

Back to top button