गुड न्यूज! बालमृत्यू दरात घट; पुणे जिल्ह्यात हजार मुलांमागे 1.97 दर, वैेद्यकीय योजनांची फलनिष्पत्ती | पुढारी

गुड न्यूज! बालमृत्यू दरात घट; पुणे जिल्ह्यात हजार मुलांमागे 1.97 दर, वैेद्यकीय योजनांची फलनिष्पत्ती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात यंदाच्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 43 हजार 529 बालकांचा जन्म झाला. त्यापैकी 86 बालकांचे कावीळ, कमी वजन, अतिसार, संसर्ग अशा विविध कारणांनी मृत्यू झाले. जिल्ह्यातील बालमृत्यू दर घटल्याचे सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्व्हेच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. हजार मुलांमागे 1.97 इतका मृत्यूदर जिल्ह्यात नोंदवला गेला आहे.

जिल्ह्यात 101 प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रे, 545 उपकेंद्रे, 130 हून अधिक सरकारी रुग्णवाहिका, 2800 आशा वर्कर आणि प्रत्येक केंद्रांमध्ये आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष, बाल उपचार केंद्र, पोषण पुर्नवसन केंद्र, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान व नवसंजिवनी योजना याद्वारे हा मृत्यूदर कमी होत आहे.

शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन गर्भधारणा लवकर ओळखणे, त्यादृष्टीने आरोग्य तपासणी करणे, बाल आरोग्य तपासणीवर लक्ष देणे, तत्काळ वैद्यकीय सेवा पुरवणे यावर भर देण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशन आणि त्यानंतर जल जीवन मिशनअंतर्गत पाण्याची गुणवत्ता चाचणी किट खरेदी करून अतिसारामुळे होणारे मृत्यू दूर करण्यात मदत झाली आहे.

भारतापेक्षा राज्याचा मृत्यूदर कमी
सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्व्हेनुसार भारताचा नवजात शिशु मृत्यूदर हा 22 तर महाराष्ट्राचा नवजात शिशु मृत्युदर 13 आहे. देशाचा बालमृत्यू दर 35 असून महाराष्ट्राचा 21 आहे. देशाचा अर्भक मृत्यूदर हा 28 असून महाराष्ट्राचा दर 16 आहे.

पुणे जिल्हा परिषदेतर्फे आरोग्य सुविधांमधील तफावत शोधून काढून, सार्वजनिक निधी आणि सीएसआरमधून मिळणारा पाठिंबा खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मानकीकरण सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य यंत्रणेतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत.

                  – आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद

बाळ जन्मल्यापासून 30 दिवसाच्या आत मृत्यू झाल्यास त्याला अर्भकमृत्यू असे म्हणतात. अतिसार, स्तनपानाअभावी रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने व बालरोगतज्ज्ञांचा सल्ला न पाळल्यास नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते. जन्मापासून वर्षभरात झालेल्या मृत्युला बालमृत्यू म्हणतात. कुपोषणाने बाळाचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे.

Back to top button