नसरापूर : अपर पोलिस अधीक्षकांनी घेतला राजगड ठाण्याचा आढावा | पुढारी

नसरापूर : अपर पोलिस अधीक्षकांनी घेतला राजगड ठाण्याचा आढावा

नसरापूर; पुढारी वृत्तसेवा : राजगड पोलिस ठाण्याची इमारत जुनी असून, जागाही अपुरी आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांना असुविधांचा सामना करावा लागतो. आरोपींना ठेवण्यासाठी लॉकअप नसल्याने महामार्गालगत नवीन पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करा, अशीही सूचना अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी राजगड पोलिसांना केली.

पुणे ग्रामीणचे बारामती विभागाचे नवनियुक्त अपर पोलिस अधीक्षक भोईटे यांनी सोमवारी (दि. 14) नसरापूर (ता. भोर) येथील राजगड पोलिस ठाण्यास भेट दिली. या वेळी त्यांनी ठाण्याच्या हद्दीतील भौगोलिक स्थितीचा आढावा घेतला. या वेळी पोलिस उपअधिक्षक धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ, मनोजकुमार नवसरे, उपनिरीक्षक संजय सुतणासे यांच्यासह शिंदेवाडी, खेडशिवापूर, किकवी दूरक्षेत्रातील पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

भोईटे यांनी राजगड ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी, संवेदनशील गावे, महामार्गावरील अपघात, पोलिस पाटील यांचे कामकाजाची माहिती घेतली. पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी नसरापूरमधील वाहतूक कोंडीबाबत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सम विषम पार्किंगचे नियोजन सुरू असल्याची माहिती दिली. यावर भोईटे यांनी सहमती दर्शवली.

 

Back to top button