जनतेतून सरपंचनिवडीने वाढणार चुरस; बारामती तालुक्यातील 13 गावांत रंगणार सामना | पुढारी

जनतेतून सरपंचनिवडीने वाढणार चुरस; बारामती तालुक्यातील 13 गावांत रंगणार सामना

बारामती; पुढारी वृत्तसेवा : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीला परवानगी दिल्यानंतर बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायत निवडणूक पुढील महिन्यात पार पडत आहे. 13 ग्रामपंचायतींत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम पार पडणार असल्याने या निवडीकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच गावागावांत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक दोन्ही गटांत आतापर्यंत जोरदार टक्कर पाहायला मिळाली आहे. भाजपही आता निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत असून, सरपंचपदाची निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे.

उच्चशिक्षित तरुण अजमावणार नशीब
जनतेतून सरपंच निवडून येणार असल्याने चुरस वाढली आहे. अनेक उच्चशिक्षित तरुणही या निवडणुकीत आपले नशीब अजमावणार आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्हीही गटांकडून सध्या पॅनेलची तयारी सुरू असून, अनेकांच्या नाकदुर्‍या काढाव्या लागत आहेत. निवडणुकीत गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडावा लागणार असून, अनेक ग्रामपंचायतींत झालेल्या भ—ष्टाचाराबद्दल, निकृष्ट कामाबद्दलही मतदारांचा रोष पत्करावा लागणार आहे.

वातावरण तापू लागले
बारामतीच्या ग्रामीण भागात सध्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. ग्रामपंचायतीवर सत्तास्थापनेसाठी गावागावातील राजकीय आखाडे चर्चेने रंगत आहेत. निवडणूक मोर्चा बांधणीसाठी गावातील जाणत्या नेत्यांनी तरुणांना साद घालत निवडणुकीच्या तयारीला लागा, अशी भावनिक साद घातली आहे. चौकाचौकांत ग्रामपंचायत निवडणुकींच्या चर्चांना ऊत आला असून, हॉटेलातील वर्दळ आता वाढू लागली आहे.

या गावात होणार मुकाबला
लोणी भापकर, पळशी, मासाळवाडी, पणदरे, सोनकसवाडी, कुरणेवाडी, वाघळवाडी, मुरुम, वाणेवाडी, सोरटेवाडी, गडदडवाडी, मोरगाव, कार्‍हाटी.

Back to top button