चाकण ; पुढारी वृत्तसेवा : एका महिलेला विनयभंगाची खोटी तक्रार देण्यासाठी चाकण पोलीस स्टेशनमध्ये पाठवून प्रकरण मिटवण्यासाठी १५ लाखांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना चाकण(ता.खेड जि.पुणे) मध्ये उघडकीस आली आहे.
एका नगरसेवकाने या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार चाकणचे माजी उपसरपंच, एक पत्रकार आणि मानवाधिकार संघटनेच्या काही महिला अशा एकूण ९ जणांवर सोमवारी (दि.१३ ) चाकण पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हॉटसअप चॅटिंग पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. नगरसेवक किशोर ज्ञानोबा शेवकरी (रा. वैशाली कॉम्प्लेक्स , चाकण, ता. खेड ) यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार माजी उपसरपंच प्रीतम परदेशी, संगीता वानखेडे, कांतीलाल शिंदे, गीतांजली भस्मे, संगीता नाईकरे, मंदा जोगदंड, कुणाल राऊत, प्रणीत नामक एक इसम आणि चाकणमधील एक पत्रकार अशा ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यातील कुणाल राऊत आणि एका पत्रकारास सोमवारी रात्रीच पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. खंडणीची ही संपूर्ण घटना ४ सप्टेंबर २०२१ ते १२ सप्टेंबर २०२१ दरम्यान आंबेठाण चौक येथील वैशाली कॉम्प्लेक्स मध्ये घडली असल्याचे पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
नगरसेवक शेवकरी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार वरील सर्व आरोपींनी व इतर सक्रीय टोळीने संगनमताने बदनामी करण्याच्या उद्देशाने सलोनी नामक महिलेस वारंवार पोलीस ठाण्यात पाठवून नगरसेवक शेवकरी यांच्या विरोधात विनयभंगाची खोटी तक्रार देण्यास सांगितले होते.
दरम्यानच्या काळात हे प्रकरण मिटवण्यासाठी ब्लॅकमेल करून सुरुवातीला १५ लाखांची मागणी केली. नंतर तडजोड करून १२ लाख किंवा ५ लाख रुपये व सलोनी यांच्या वैद्यकीय उपचारासाठी वारंवार पैशांची मागणी केली. पैशांची मागणी करण्याच्या सर्व घटना नगरसेवक शेवकरी यांच्या ऑफिसमध्ये असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या आहेत. त्याच प्रमाणे पैशांच्या मागणीचे व्हॉटसअप चॅटिंग देखील समोर आले आहे.
या घटनेने चाकण शहरात एकाच खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड, उपनिरीक्षक विजय जगदाळे अधिक तपास करीत आहेत. पत्रकारासह दोघांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपी फरारी आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.