पुणे : फार्मसी प्रवेशाची दोन महिने नोंदणीच! गुणवत्ता यादी 7 डिसेंबरला जाहीर | पुढारी

पुणे : फार्मसी प्रवेशाची दोन महिने नोंदणीच! गुणवत्ता यादी 7 डिसेंबरला जाहीर

गणेश खळदकर

पुणे : अभियांत्रिकी, कृषी पदवी प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र, लवकर निकाल लागूनही फार्मसी प्रवेशासाठी गेल्या दोन महिन्यांपासून केवळ नोंदणीच सुरू आहे. त्यामुळे पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास नेमकी अडचण काय आहे? असा प्रश्न आता विद्यार्थी आणि पालक विचारत आहेत. फार्मसीच्या नोंदणीसाठी वारंवार मुदतवाढ मिळत आहे.

आधी प्रवेशासाठी 28 ऑक्टोबरपर्यंत, नंतर 12 नोव्हेंबरपर्यंत, तर आता थेट 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ नोंदणीसाठी 28 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर, असे तब्बल दोन महिने लागणार आहेत. प्रवेश प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थी, पालकांसह महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राचार्य देखील वैतागले आहेत.

राज्यात फार्म डी., बी. फार्मसी व डी. फार्मसीचे सर्वच प्रवेश मुदतवाढीमुळे रखडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या वर्षीचे वेळापत्रक जून 2023 च्या पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे विभागात फार्मसीचे 135 महाविद्यालये आहेत. तर राज्यभरात सुमारे 57 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. राज्यात डिप्लोमाच्या 35 हजार जागा असून, पदवीच्या 15 हजार जागा आहेत.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार बी. फार्मसी, फार्म डी. प्रवेशासाठी मुदत व कागदपत्र पडताळणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. तर, 2 डिसेंबरला अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. तसेच, 3 ते 5 डिसेंबरदरम्यान आक्षेप नोंदविण्यात येतील आणि 7 डिसेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेश पूर्ण होण्यास थेट नवीन वर्ष उजाडणार असल्यामुळे प्रवेशासाठी इच्छुकांची धाकधुक वाढल्याचे दिसून येत आहे.

डी. फार्मसीची नोंदणी सुरूच…
डिप्लोमा इन फार्मसी म्हणजेच डी. फार्मसी नोंदणीसाठी 15 नोव्हेंबर ही नोंदणीसाठी मुदत देण्यात आली आहे. कागदपत्रे पडताळणीसाठी देखील 15 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर, सुविधा केंद्रांवर जाऊन प्रत्यक्ष कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी 18 ते 20 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे. फार्मसी डिप्लोमासाठी 9 जून ते 15 नोव्हेंबर असा प्रदीर्घ कालावधी केवळ नोंदणीसाठीच देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

तंत्रशिक्षण संचालनालय, सीईटी सेलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
वर्ष संपत आले तरी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या माध्यमातून होत असलेली प्रवेश प्रक्रिया पूर्ण होताना दिसत नाही. प्रत्यक्षात एप्रिल महिन्यापासूनच एजन्सीची निवड आणि सीईटीची तयारी करण्यात आली होती. परंतु, प्रवेश प्रक्रियेत सीईटी सेल आणि तंत्रशिक्षण विभागातील अधिकारी काहीतरी अनियमितता करीत असल्यामुळे प्रवेशांना उशीर होत असल्याचा आरोप पालक करीत आहेत. त्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालय आणि सीईटी सेलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Back to top button