पारगाव : कामगारांनी चिमुकल्यांकडे लक्ष द्यावे | पुढारी

पारगाव : कामगारांनी चिमुकल्यांकडे लक्ष द्यावे

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात ऊस तोडणीची कामे वेगात सुरू झाली आहेत. या परिसरात बिबट्यांचा वावर सर्वाधिक आहे. बिबट्यांचे जनावरांवर हल्ले सतत होत असताना ऊसतोड कामगारांची लहान मुले ही ऊस शेताच्या बांधावर, रस्त्यांवर, अडचणीच्या ठिकाणी खेळताना दिसतात. यामुळे माता-पित्यांनी या चिमुकल्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

तालुक्याच्या पूर्व भागातील गावे ही भीमाशंकर व विघ्नहर सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येतात. या दोन्हीही कारखान्यांचा यंदाचा गाळप हंगाम सुरू झाल्याने या भागात ऊसतोड जोरात सुरू झाली आहे. हा परिसर बिबट्या प्रवण क्षेत्रात येतो. पारगाव, शिंगवे, रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे आदी गावांमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात बिबट्यांचे पाळीव जनावरांवर देखील हल्ले मोठ्या प्रमाणात होत आहेत. शेतकर्‍यांना शेतांमध्ये पिकांना पाणी देताना बिबट्यांचे दर्शन अनेकदा होत आहे. हा परिसर नेहमीच बिबट्यांचा दहशतीखालीच आहे.

ऊसतोडणी करणार्‍या कामगारांना दररोजच जीव मुठीत घेऊन काम करावे लागते. ते भल्या पहाटेच अंधार असताना ऊसतोडणीसाठी शेतांमध्ये दाखल होतात. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची लहान लहान मुलेदेखील असतात. अनेक वेळा त्यांना शेतातच झाडांना झोका बांधून मुलांना त्यामध्ये झोपवावे लागते. परंतू ऊसतोडणीचे काम सुरूच ठेवावे लागते. त्यांच्याकडे त्यांच्या माता-पित्यांचे अजिबात लक्ष नसते .
रस्त्यांवर खेळत असताना अपघातदेखील घडू शकतात किंवा बिबट्यांचे हल्लेदेखील होऊ शकतात . यासाठी माता-पित्यांनी ऊसतोडणीचे काम सुरू असताना लहान मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

Back to top button