ताथवडेतील रस्त्यावर कचर्‍याचे ढीग | पुढारी

ताथवडेतील रस्त्यावर कचर्‍याचे ढीग

ताथवडे : येथील पुणे-मुंबई महामार्गावरील असणार्‍या पुण्याच्या दिशेने जाणार्‍या ताथवडे सेवा रस्त्यावर कचर्‍याचे ढीग साचले असून, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पुणे-मुंबई महामार्गाच्या दुतर्फा असे अनेक कचर्‍याचे ढीग निर्माण झाल्याने महामार्गाचे विद्रुपीकरण होत आहे. कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून, प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. ताथवडे येथील नरहरी सोसायटीकडे जाणार्‍या रस्त्यावर असे ढीग मोठ्या प्रमाणात आहेत.

काही नागरिक येथील रस्त्यावरच लघुशंका करताना दिसत आहेत. त्यामुळे एकीकडे कचरा आणि त्याच शेजारी लघुशंका करणारे नागरिक, वाहनचालक यांमुळे या रस्त्यावरून जाताना महिलावर्ग संकोच करतात. अनेक नामांकित कंपन्या, उपहारगृहे, वाहनांचे शोरुम, कॉलेजेस, शाळा या परिसरात असल्याने अनेक नागरिक या रस्त्याचा वापर करतात; परंतु रस्त्याच्या अशा बकाल अवस्थेमुळे येथील नागरिक पुरते हैराण झाले असून, लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ते करीत आहेत.

Back to top button