एकवीरादेवी मंदिर परिसर समस्यांच्या विळख्यात | पुढारी

एकवीरादेवी मंदिर परिसर समस्यांच्या विळख्यात

कार्ला : महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचा मंदिर परिसर समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक व स्थानिक ग्रामस्थ यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. मंदिर परिसरातील समस्या सोडविण्यासाठी शासनाकडून कोणतीही ठोस कृती होत नसल्याने या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अशोक कुटे यांनी 23 नोव्हेंबरपासून उपोषणाचा इशारा दिला आहे.

पायथा रस्त्याचे काम अर्धवट
याबाबत जिल्हाधिकार्‍यांना कुटे यांनी निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की कार्ला फाटा ते एकवीरादेवी पायथा रस्त्याचे काम पूर्ण करावे, एकवीरा देवी पायथा मंदिराजवळ असलेल्या वनविभागाच्या मोकळ्या जागेचे सपाटीकरण करून ती जागा वाहनतळासाठी वापरण्यासाठी आदेश देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवारा शेडची व्यवस्था करा
गडाकडे जाणार्‍या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येणार्‍या पायर्‍यांची डागडुजी करून पायर्‍यांच्या बाजूने पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची तसेच, ठिकठिकाणी निवारा शेडची व्यवस्था करण्यात यावी, पाच पायरी पार्किंगच्या लगत असलेल्या वनविभागाच्या जागेमध्ये वन उद्यानाची उभारणी करण्यात यावी आणि पायथा मंदिरापाशी असणार्‍या ऐतिहासिक तलावाचे बांधण्यात आलेले कठडे तुटलेले असून ते दुरुस्त करून तलावालगत असलेल्या जागेत छोटेसे बालउद्यान उभारण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

Back to top button