पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वेचा खेडमध्ये मार्ग बदलला | पुढारी

पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वेचा खेडमध्ये मार्ग बदलला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाच्या मार्गाला खेड तालुक्यात ब्रेक लागला आहे. संरक्षण विभागाच्या आक्षेपानंतर बारा गावांमधील मार्गाची कामे बदलावी लागली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खेड तालुक्यातून मार्ग बदलला असून, सुधारित मार्गाचा आराखडा रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.

सध्याच्या स्थितीत खेड तालुक्यातील या रेल्वे प्रकल्पाचे काम काही काळासाठी थांबविले आहे. लष्कराच्या जागेतून हा प्रकल्प जात असल्याने आक्षेप घेण्यात आला आहे. पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतून हा रेल्वेमार्ग प्रस्तावित केला आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर अशा चार तालुक्यांत मिळून एकूण 54 गावांचा यात समावेश आहे. पुणे जिल्ह्यात पुणे या पहिल्या स्थानकासह हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या स्थानकांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘संरक्षण विभागाकडून प्रकल्पाच्या खेड येथील आराखड्याला आक्षेप घेण्यात आला आहे. लष्कराच्या केंद्राला पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे त्याला बाधा येत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. येथील गावांमधील मोजणी आणि संपादित करण्यात येणार्‍या जागेचे मूल्यांकनही पूर्ण करण्यात आले होते. आता 12 गावांमधील मार्गाचा नव्याने आराखडा करण्यात आला आहे. हा सुधारित मार्गाचा आराखडा रेल्वे प्रशासनाला पाठविण्यात आला आहे.

’ दरम्यान, पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्रालयाने काही तांत्रिक बाबी उपस्थित करून रस्ता-लोहमार्ग करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, या प्रकल्पाबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रकल्पासाठीचे भूसंपादन सुरू ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.’

आत्तापर्यंत 26 खरेदीखत
पुणे जिल्ह्यातून या प्रकल्पासाठी आत्तापर्यंत 26 पेक्षा जास्त खरेदीखते करण्यात आली आहेत. पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांपैकी सर्वाधिक खरेदीखत पुणे जिल्ह्यात झाली आहेत. आत्तापर्यंत 20 हेक्टरपेक्षा जास्त जागा सहमतीने ताब्यात घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

Back to top button