मांडवगण फराटा : घोडगंगा साखर कारखान्यासाठी 71 टक्के मतदान | पुढारी

मांडवगण फराटा : घोडगंगा साखर कारखान्यासाठी 71 टक्के मतदान

मांडवगण फराटा; पुढारी वृत्तसेवा : न्हावरा (ता. शिरूर) येथील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीकरिता मोठ्या उत्साहात मतदान झाले. शेवटच्या क्षणापर्यंत 71 टक्के मतदान झाले होते. एकूण मतदानापैकी 13 हजार 826 एवढे मतदान झाले आहे. शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीची गेल्या आठ दिवसांपासून रणधुमाळी सुरू होती. सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू होते.

तसेच नुकतीच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मांडवगण फराटा येथे प्रचार सभा पार पडली. यातही दोन्ही बाजूने आरोपांच्या फैरी सुरू होत्या. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया सुरू असताना माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे निधन झाल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे नव्हे, तर जिल्ह्याचे लक्ष लागून होते.

रविवारी (दि. 6) मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजता सुरू करण्यात आली. काही ठिकाणी दुपारी मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदान केंद्रावरील अधिकारी हे नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेत होते. तर, मतदान प्रक्रिया सुटसुटीत असल्याने मतदारांचा मतदान करताना गोंधळ होत नसल्याने लवकर मतदार बाहेर पडत होते. त्यामुळे कुठेही फार मोठ्या रांगा दिसून येत नव्हत्या. पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मांडवगण फराटा येथील केंद्रावर 103 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक असलेले विनायक पांडुरंग फराटे यांनी मतदानाचा हक्क बजाविला. सोमवारी (दि. 7) कानिफनाथ मंगल कार्यालय, न्हावरे फाटा येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे कोण जिंकणार, कोण हरणार, याची उत्सुकता सभासदांना लागून राहिली आहे.

मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे : इनामगाव – 612, शिरसगाव काटा – 376, मांडवगण फराटा – 1615, वडगाव रासाई – 977, नागरगाव – 474, तांदळी – 503, सादलगाव – 343, गणेगाव – 487, पिंपळसुटी – 280, बाभुळसर बुद्रुक – 366 आणि कुरुळी – 212.

निवडणुकीत ज्येष्ठांनीदेखील केले उत्साहात मतदान
रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अटीतटीच्या निवडणुकीत सर्जेराव यशवंत ढमढेरे या 95 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद शाळेत रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी 62 टक्के मतदान शांततेत पार पडले. सकाळी 8 वाजेपासून मतदान केंद्रावर मतदार आपला मतदानाचा अधिकार बजवण्यासाठी हजर होते. तळेगाव ढमढेरे परिसरात एकूण 959 मतदार आहेत. त्यातील 596 मतदारांनी मतदान केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिग्विजय आहिर यांनी काम पाहिले.

Back to top button