पुणे रेल्वे स्थानक झाकोळले! हेरिटेज वास्तूच्या शोभेत बाधा | पुढारी

पुणे रेल्वे स्थानक झाकोळले! हेरिटेज वास्तूच्या शोभेत बाधा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: हेरिटेज वास्तूलगत कोणतेही बांधकाम करण्यास अथवा स्टॉल उभारण्यास परवानगी नसतानाही केवळ उत्पन्नवाढीसाठी रेल्वे प्रशासनाकडून पुणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीला लागूनच दुचाकीचे शोरूम उभे राहात आहे. यामुळे स्थानकाची इमारत झाकली जात असून, या वास्तूच्या शोभेस बाधा निर्माण होत असल्याचे आहे. रेल्वे प्रशासनाने ऐतिहासिक वास्तूचा विचार न करता यापूर्वी रेल्वे स्थानक परिसरात स्टॉल सुरू करण्यास परवानगी दिली.

त्यानंतर मोठ-मोठे फलक उभारून त्याद्वारे जाहिरातबाजी करण्यास परवानगी दिली. यामुळे अगोदरच रेल्वे स्थानकाचे विद्रूपीकरण होत असताना पुन्हा प्रशासनाने एका नामांकित कंपनीच्या दुचाकीचे शोरूम येथे उभारण्यास परवानगी दिली आहे. हे शोरूम इमारतीला लागून उभारण्याचे काम सुरू असून, प्रशासनाच्या या कामकाजामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

पुणे रेल्वे स्थानकाचा इतिहास…
पुणे रेल्वे स्थानकाची स्थापना 1858 साली इंग्रजांनी केली. त्या वेळी ही इमारत एखाद्या कौलारू घराप्रमाणे होती. त्यानंतर 27 जुलै 1925 रोजी इंग्रजांनीच या स्थानकाच्या वास्तूचे पुनर्निमाण केले. आता उभी असलेली हीच ती पुनर्निमाण झालेली पुणे रेल्वे स्थानकाची इमारत! इंग्रज वास्तुविशारद जेम्स बरकले यांनी ही इमारत साकारली. ही इमारत बांधण्यासाठी त्या वेळी सुमारे 5 ते 6 हजार रुपये खर्च आला होता. त्यानंतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनलच्या इमारतीसह पुणे रेल्वे स्थानकाच्या या वास्तूला हेरिटेज दर्जा देण्यात आला.

आम्ही नियमानुसार हे शोरूम उभारण्यास परवानगी दिली आहे. हेरिटेज इमारतीमध्ये हे शोरूम उभारले जात नाही. ते बाहेरील बाजूस आहे. हेरिटेज इमारतीला कोणत्याही प्रकारचा धक्का लावला जाणार नाही.
                                                                       – मिलिंद हिरवे,
                                     वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे, पुणे विभाग

पुणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीला हेरिटेजचा दर्जा प्राप्त आहे. या इमारतीच्या परिसरात कोणतेही बांधकाम उभारणे चुकीचे आहे. मात्र, केवळ उत्पन्नवाढीसाठी हेरिटेज इमारतीला लागूनच रेल्वे प्रशासनाने दुचाकीचे शोरूम उभारायला परवानगी दिली आहे. रेल्वेने अशा प्रकारे इमारतीची शोभा घालवू नये.

                                                   – हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

Back to top button