वडगावपीर- मांदळेवाडीत कांदा लागवड सुरू | पुढारी

वडगावपीर- मांदळेवाडीत कांदा लागवड सुरू

लोणी- धामणी; पुढारी वृत्तसेवा: एकीकडे बराखीत ठेवलेला कांदा खराब होऊ लागल्याने व सध्या काद्यांच्या भावात कधी चढ तर कधी उतार होत असल्याने मिळेल त्या किमतीत शेतकर्‍यांनी कांदा विक्रीस काढला आहे. सध्या जरी कांद्याला बर्‍यापैकी बाजारभाव मिळत असला तरी आगामी काळात कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेवर आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात वडगावपीर, लोणी, धामणी, मांदळेवाडी, वाळुंजनगर, खडकवाडी, पोंदेवाडी, लाखणगाव, जारकरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवडी सुरू आहेत.

या वर्षी लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळेवाडी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाण्याचा अंदाज घेऊन शेतकरी कांदा लागवड करत आहेत. काही शेतकरी कांदा लागवड करतात तर काहींचा लागवड केलेला कांदा खुरपणीला आला आहे. सध्या या परिसरात सर्वच ठिकाणी कांदा लागवड सुरू असल्याने मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे.

त्यासाठी सावड पद्धतीने कांदा लागवड करावी लागते, असे मांदळेवाडी येथील प्रगतशील शेतकरी सचिन मांदळे व बाबू मांदळे यांनी सांगितले. कांद्याच्या भावात होणाऱ्या चढ-उतारामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्यासाठी शासनाने कांद्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी वडगावपीर सोसायटीचे अध्यक्ष फकिरा ज्ञानेश्वर आदक, पोपट आदक, हनुमंत आदक, संभाजी आदक, संतोष आदक यांनी केली आहे.

Back to top button