निमोणे : विक्रमी बाजारभाव दिला नाही, तर मी जबाबदार: प्रचार सभेत अजित पवार यांची घोषणा | पुढारी

निमोणे : विक्रमी बाजारभाव दिला नाही, तर मी जबाबदार: प्रचार सभेत अजित पवार यांची घोषणा

निमोणे : भाजप सरकारने कुटील राजकारण करून रावसाहेबदादा घोडगंगा कारखान्याला को-जनरेशन प्रकल्पावरून अडचणीत आणले. तब्बल 39 कोटी रुपये व्याजापोटी कारखान्याला भुर्दंड बसला. आज दाहीदिशांना दहा तोंडे असणार्‍या मंडळींनी खिचडी करून खोट्या-नाट्या आरोपांची राळ उठवली आहे.

सभासदांनो, हा अजित पवार तुम्हाला शब्द देतोय, घोडगंगेचे चांगले दिवस थोड्याच दिवसांत बघायला मिळतील. तुम्ही शेतकरी विकास पॅनेलला साथ द्या, आगामी दोन ते तीन वर्षात घोडगंगाने विक्रमी बाजारभाव दिला नाही, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील, अशी ठाम ग्वाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी पवार म्हणाले, मोदी सरकार असो की शिंदे-फडणवीस, यांना शेतकर्‍यांचे काहीच देणे-घेणे नाही. मोदी सरकारने साखर निर्यातीला कोटा पद्धत सुरू केल्याने कारखानदारी अडचणीत आली आहे, हे सरकार उद्योगपतींना पायघड्या घालते; मात्र शेती व शेतकर्‍यांसाठी काही करायचे असेल तर मात्र हात आखडता घेते.

मी जबाबदारीने सांगतो, विरोधक ज्या पद्धतीने घोडगंगेवर कर्जाचा बोजा असल्याचे सांगत आहेत तशी अजिबात परिस्थिती नाही. मी माहिती घेतली असून, जे काही कर्ज दिसत आहे ते चालू कर्ज आहे. शिरुर तालुक्यात 35 लाख मेट्रिक टन उसाचे क्षेत्र आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नवीन सहकारी साखर कारखाना काढण्याला सरकारने बंदी घातली.

त्यामुळे खासगी साखर कारखानदारी उदयाला आली. जर खासगी कारखाने नसते तर अतिरिक्त उसाचे काय झाले असते, विरोधी पॅनेलच्या सगळ्या मंडळींंची मला चांगली माहिती आहे. सभासदांनो, शेतकरी विकास पॅनेलला साथ द्या. कोणत्याही संस्थेचे नेतृत्व जर खंबीर असेल तरच संस्थेचा गाडा नीट चालतो याचे भान ठेवा, असे आवाहन पवार यांनी केले.

या वेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, भाजपाचे सहकारात योगदान काय ? अनंत कष्ट, हालअपेष्टा खाऊन रावसाहेबदादा पवार यांनी घोडगंगा उभा केला. या संस्थेचा कारभार अशोक पवार यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाच्या हातातच सुरक्षित राहू शकतो, याची जाणीव ठेवून त्यांना साथ द्या.

या वेळी आमदार अशोक पवार यांनी कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती दिली. त्याच बरोबर विरोधक शिवराळ भाषेत करत असलेल्या टीका- टीप्पणीवर तीव्र नापसंती व्यक्ती केली. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे यांचेदेखील भाषण झाले. या सभेला माजी आमदार काकासाहेब पलांडे, जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष केशरताई पवार, प्रकाश पवार, देवदत्त निकम, रवि काळे, मानसिंग पाचुंदकर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Back to top button