पुणे : खगोलीय आविष्काराचा अद्भूत नजारा! | पुढारी

पुणे : खगोलीय आविष्काराचा अद्भूत नजारा!

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कधी नव्हे ते आकाश निष्प्रभ असल्याने आंशिक सूर्यग्रहण पाहण्याचा योग पुणेकरांनी 4 वाजून 51 मिनिटांपासून घेतला. सुरुवातीला दहा मिनिटे ग्रहण लागले की नाही, हे एकमेकांना विचारताना खगोलप्रेमी दिसून आले. दरम्यान ‘आयुका’ व बालगंधर्व ब्रिजवर ज्योतिष विद्या परिषदेने ग्रहण पाहण्याची सोय केल्याने नागरिकांनी गर्दी केली होती.

बुधवारी झालेल्या सूर्यग्रहणानंतर आता 8 नोव्हेंबर रोजी ‘चंद्रग्रहण’ पाहण्याचा योग येणार आहे. पुण्यात खगोलशास्त्रावर संशोधन करणारी ‘आयुका’ सारखी संस्था असतानाही टीव्ही मीडियाने मंगळवार सकाळपासून ग्रहणाविषयी अंधश्रद्धा पसरवणार्‍या बातम्या दिल्या. पुण्यातील आकाश निरीक्षक व आकाशगंगेतील बदलावर काम करणार्‍या संस्थांनी पुणेकरांसाठी सूर्यग्रहण पाहण्याची व्यवस्था केली होती. खगोलप्रेमींनी ग्रहण काळातील सूर्याचे बदल आणि प्रत्यक्ष डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी गर्दी केली होती. आकाश निरीक्षक म्हणून काम करणारे डॉ. प्रकाश तुपे यांनी ग्रहण निरीक्षणाबद्दल बोलताना सांगितले की, तब्बल सव्वातास ग्रहण चांगल्या प्रकारे अनुभवता आले.

चष्मे उपलब्ध न झाल्याने अनेक नागरिकांनी खुल्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहिले. आकाश निरभ— असल्याने व सूर्याचा तांबूस रंग असल्याने त्याचा कोणताच धोका जाणवला नाही. मंगळवारी सायंकाळी 4 वाजून 51 मिनिटांनी सूर्यग्रहण सुरू झाले असले तरी सकाळपासूनच टीव्ही मीडियाने ग्रहण पाहू नये किंवा गरोदर महिलांनी ते टाळावे अशा बातम्या दाखवून अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केलेले आहे. डॉ. तुपे म्हणाले की, आमचा देवाविषयी राग नसून तो अंधश्रद्धेविषयी आहे. आजचे ग्रहण हे खंडग्रास असून खग्रास ग्रहण असते तर खूप काही निरीक्षण करता आले असते.

Back to top button