पिंपरी : रेडिमेड फराळाला मागणी | पुढारी

पिंपरी : रेडिमेड फराळाला मागणी

पिंपरी : दिवाळीनिमित्त फराळ तयार करण्यासाठी गृहिणींची मोठी लगबग सुरू आहे; मात्र नोकरी, व्यवसाय करणार्‍या अनेक महिलांना कमी सुट्या आणि वेळेअभावी रेडिमेड फराळाला मागणी आहे.

दिवाळी सणामध्ये सर्वात जास्त चालणारा व्यवसाय म्हणजे घरगुती तयार फराळ. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हा फराळ उत्तम प्रकारे पॅक केला जातो. तसेच फराळाची घरगुती चव आणि दर्जा यामुळे फराळाचा व्यवसाय जोरात चालतो. यामुळे गेल्या काही वर्षांपासून घरगुती पदार्थ तयार करणार्‍या महिला, महिला बचत गट यांना उत्पन्नाचे साधन मिळाले.

शहरातील विविध भागांतील महिला बचत गटांकडून दिवाळी फराळाचे पदार्थ तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे. विविध कार्यालये, संस्था, कारखानदार तसेच व्यावसायिकांकडून कामगारांना भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात फराळाची खरेदी केली जाते. त्यामुळे दिवाळी फराळ तयार करणार्‍या बचत गटांकडे आगाऊ नोंदणी केली जाते. नोंदणीनुसार बचत गटांकडून फराळ तयार केला जात आहे. बचत गटांकडून लाडू, करंजी, चकली, शंकरपाळे, अनारसे, चिवडा, मोतीचूर लाडू, जामून आदी पदार्थ तयार केले जात आहेत..

Back to top button