पुणे : जिल्हा परिषदेत दिवाळी महोत्सवाचे उदघाटन, महिला स्वयंसहाय्यता गटांनी बनवलेल्या पदार्थांची विक्री | पुढारी

पुणे : जिल्हा परिषदेत दिवाळी महोत्सवाचे उदघाटन, महिला स्वयंसहाय्यता गटांनी बनवलेल्या पदार्थांची विक्री

पुणे : पुढारी : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित दिवाळी महोत्सव २०२२ विक्री व प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या पत्नी विजया देशमुख यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक शालिनी कडु व जिल्हा अभियान व्यवस्थापक नितीन पंतगे, जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रदर्शनाच्या माध्यमातून उमेद महिला स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू व खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी या वस्तू खरेदी कराव्यात असे अवाहन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

जिल्हा परिषदेमधील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या महिला फोरम ग्रुप मधील विशेष कामकाज असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा श्रीमती देशमुख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मार्फत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी महिला स्वयंसहाय्यता समुहांमार्फत विविध प्रकारच्या वस्तू व उत्पादनांची विक्री करण्यात येते. दीपावली निमित्त महिलांनी उत्पादित केलेले दिवाळी फराळ, आकाश कंदील, पणत्या, घरगुती उटणे, मसाले, कडधान्य व इतर उत्पादने इ. महिला स्वयंसहाय्यता समुहांनी बनवलेले पदार्थ विक्रीसाठी १८, १९ व २० ऑक्टोंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत नवीन जिल्हा परिषद, पुणे व विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग, पुणे येथे प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. दिवाळी फराळ विक्री प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा आणि ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता समुहांच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी केले आहे.

Back to top button