पिंपरी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या दालनात शाई फेक | पुढारी

पिंपरी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या दालनात शाई फेक

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी महापालिका : कासारवाडी भागातील महिलांनी विविध नागरी प्रश्‍नांबाबत आंदोलनकर्त्यांना आयुक्‍त राजेश पाटील यांना भेटू न दिल्याने संतप्त झालेल्या महिलांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर नामफलकावर शाई फेकली.

ही घटना गुरूवारी (दि. ९) पावणेतीनच्या सुमारास घडली. तातडीने पोलिस फौजफाटा आल्याने संबंधित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेने केल्याचे सूत्रांनी सांगितले.

कासारवाडी भागांत रस्ते खोदकाम करून ठेवले आहे. ते काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच, इतर कामे केली जात नसल्याने रहिवाशी त्रस्त झाले आहे.

या संदर्भात तेथील महिलांनी महापालिका भवनात गर्दी केली. त्यांना आयुक्तांना भेटू न दिल्याने त्यांनी घोषणाबाजी केली.

त्यातील काही महिलांनी आयुक्तांच्या नामफलकावर शाई टाकत त्यांचा निषेध केला. आयुक्तांना काही महिलांनी शिवीगाळ केल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.

या घटनेनंतर पालिकेचे सुरक्षारक्षक तसेच, पोलिस कुमक मागविण्यात आली. त्यामुळे पालिकेस छावणीचे स्वरूप आले. त्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेविकेने घडवून आणल्याचे चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

Back to top button