आंबेगावच्या पूर्व भागात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट, बंद बंगल्यांना चोरट्यांनी केले लक्ष्य | पुढारी

आंबेगावच्या पूर्व भागात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट, बंद बंगल्यांना चोरट्यांनी केले लक्ष्य

 लोणी-धामणी, पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. मंगळवारी (दि. 11) पहाटे निरगुडसर, ढोबळेवाडी, मांदळेवाडी येथील बंद बंगल्यांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. मांदळेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्या ज्योती अरुण गोरडे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी 32 इंची एलईडी कलर टीव्ही, सात ग्रॅम सोन्याचे दागिने, मिक्सर पळविला. पोलिस पाटील काळुराम पालेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पारगाव पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लोहकरे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरटे अंदाजे पाच जण होते व ते स्पोर्ट बाईकवर आले होते, असे मांदळेवाडी ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

चोरट्यांनी पुढे मांदळेवाडीजवळ असलेल्या ढगेवाडी येथील दिवंगत माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब शिंदे यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील एलईडी कलर टीव्ही व कुलर पळविला.

बुधवारी (दि. 12) दुपारी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे अधिकारी दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले यांनी मांदळेवाडी येथे घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. खैरेनगर व कान्हुर मेसाई येथील पाबळ-शिरूर रोडवरील घरातील व हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. सध्या काकड आरतीचा कार्यक्रम बहुतेक मंदिरांत सुरू असल्याने याचाच फायदा चोरटे घेत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

Back to top button