पारगाव : वळतीच्या लोंढे मळ्यात चार बिबट्यांचा वावर | पुढारी

पारगाव : वळतीच्या लोंढे मळ्यात चार बिबट्यांचा वावर

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: वळती (ता. आंबेगाव) गावानजीक लोंढे मळा परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. गुरुवारी (दि. 13) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चार बिबटे दिसल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वळती गावठाणानजीक लोंढे मळा आहे. येथे उसाचे क्षेत्र अधिक आहे. गेली अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर आहे. अनेकदा बिबट्याचे दर्शन शेतकर्‍यांना झाले आहे. येथे राहणारा ओंकार गणपत लोंढे हा तरुण घरासमोरील शेडमध्ये झोपला होता.

गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्याला अचानक कोंबड्या व शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आला. त्याने उठून पाहिले असता कोंबड्यांच्या शेडच्या दिशेने बिबट्या येत असल्याचे त्याला दिसले. लोंढे याला पाहून बिबट्या शेडच्या पलीकडच्या बाजूला उडी मारून बांधाच्या दिशेला गेला. ओंकार याने बॅटरीच्या उजेडात बांधाच्या दिशेला पाहिले असता त्यास चार बिबटे दिसले.

त्यामध्ये तीन मोठे व एक छोटा बछडा होता. लोंढे याने गुरुवारी सकाळी पाहणी केली असता तेथे बिबट्याच्या पावलांचे ठसे मोठ्या प्रमाणात आढळले. एकाच वेळी चार बिबटे दिसल्याने लोंढे मळा परिसरात घबराट पसरली आहे. येथून शिंगवे रस्ता जातो. या रस्त्यावर कायमच वाहनांची वर्दळ असते. दुचाकीस्वारांनी बिबट्याच्या वावरामुळे चिंता व्यक्त केली.

Back to top button