स्वारगेट ठप्प…! डिझेलमुळे बुधवारी सकाळी प्रवाशांना वेटिंग | पुढारी

स्वारगेट ठप्प...! डिझेलमुळे बुधवारी सकाळी प्रवाशांना वेटिंग

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शंकरशेठ रस्त्यावरील डिझेल पंपावर बुधवारी सकाळी स्वारगेट आगारातील एसटी गाड्यांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसले. डिझेल समस्येमुळे या रांगा लागल्या. त्यामुळे सकाळी काही वेळ स्वारगेट आगाराची प्रवासी सेवा ठप्प झाली. परिणामी, प्रवाशांना आगारात तासभर वाट पाहावी लागली. स्वारगेट आगार आणि एसटी मुख्यालयाला लागूनच असलेल्या शंकरशेठ रस्त्यावरील डिझेल पंपावर एसटीच्या गाड्यांमध्ये काही महिन्यांपासून नियमितपणे डिझेल भरले जात आहे.

बुधवारी देखील येथे डिझेल टाकण्यासाठी एसटीच्या बस एकामागे एक उभ्या होत्या. या बसगाड्यांना येथे डिझेल टाकण्यासाठी बराच वेळ लागल्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती अन् सर्वत्र एसटी महामंडळाकडे डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याने सेवा ठप्प झाली आहे, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, एसटी अधिकार्‍यांनी डिझेल पंपावर आलेल्या तांत्रिक समस्येमुळे अशी स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले.

स्वारगेट आगारातील गाड्या बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे शंकरशेठ रस्त्यावर डिझेल भरण्यासाठी उभ्या होत्या. त्याचवेळी येथील पंपावर आलेल्या तांत्रिक समस्येमुळे गाड्यांना काही वेळ उशीर झाला. मात्र, आम्ही प्रवाशांना तत्काळ दुसर्‍या गाड्या उपलब्ध करून दिल्या आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने प्रयत्न केले. सकाळी आगारातील सर्वच्या सर्व गाड्या प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाल्या होत्या.

                                  – गोविंद जाधव, स्थानकप्रमुख, स्वारगेट आगार, एसटी

Back to top button