पिंपरी: युवा सेनेचे नेतृत्व सूरज बाबर यांच्याकडे? | पुढारी

पिंपरी: युवा सेनेचे नेतृत्व सूरज बाबर यांच्याकडे?

नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाविरोधात पुकारलेले बंड व भाजपच्या मदतीने बनविलेले सरकार आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात केलेला प्रवेश याचे पडसाद शहर युवासेनेत उमटले आहेत. युवा सेनेच्या अनेक पदाधिकार्‍यांनी राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे युवा सेनेच्या शहर अधिकारीपदी माजी खासदार गजानन बाबर यांचे पुत्र सूरज बाबर यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले होते; मात्र काही दिवसांतच त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राजेश वाबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. अनेकांचे तळ्यात- मळ्यात सुरू असतानाच युवा सेनेत मात्र पडझड झाली. बारणे यांचे चिरंजीव विश्वजीत बारणे यांच्याकडे युवा सेनेचे पिंपरी- चिंचवड शहर अधिकारी पद होते. त्यांनी युवा सेनेला रामराम केला व ते शिंदे गटात सहभागी झाले. या पाठोपाठ पिंपरी विधानसभा मतदारसंघ अधिकारी नीलेश हाके, युवा सेनेचे चिंचवड विधानसभा मतदारसंघ युवा अधिकारी माऊली जगताप यांनीही युवा सेनेचा राजीनामा दिला व शिंदे गटात प्रवेश केला. प्रचंड पडझड झालेल्या युवा सेनेला सावरण्यासाठी पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पिंपरी- चिंचवड शहर अधिकारीपदी शिवसेनेचे दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांचे चिरंजीव सूरज बाबर यांना संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जुने कार्यकर्ते जोडण्यासाठी संधी मिळण्याची शक्यता

नगरसेवक, आमदार, खासदार असा प्रवास केलेले दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांनी 45 वर्षे सेनेचे निष्ठेने काम केले. मागील लोकसभा निवडणुकीत बाबर यांना उमेदवारी नाकारून शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली. त्या वेळी बाबर यांनी शिवबंधन तोडले व मनसेत प्रवेश केला; मात्र तेथे त्यांचे मन रमले नाही. मला शिवसैनिक म्हणून भगव्यातच मरायचे आहे, अशी भावपूर्ण साद त्यांनी उद्धव ठाकरे यांना घातली. ठाकरे यांनी बराच काळ त्यांना वेटिंगला ठेवले; मात्र नंतर बाबर यांना शिवसेनेत प्रवेश मिळाला. बाबर यांच्या निधनानंतर त्यांना भगव्यातच गुंडाळून अग्नी देण्यात आला. त्यानंतर आता सूरज बाबर हे युवा सेना अधिकारी पदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. पक्षातील जुने कार्यकर्ते जोडले जावेत, यासाठी बाबर यांना संधी दिली जाण्याची शक्यता शिवसेना वर्तुळात व्यक्त होत आहे.

Back to top button