शिवनगर : गावांचा निर्णय कारखान्याचे हित पाहून घ्यावा: अजित पवार यांचे आवाहन | पुढारी

शिवनगर : गावांचा निर्णय कारखान्याचे हित पाहून घ्यावा: अजित पवार यांचे आवाहन

शिवनगर; पुढारी वृत्तसेवा: माळेगाव साखर कारखान्याने सोमेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दहा गावे समाविष्ट करण्याचा निर्णय सभासदांचे मत आणि कारखान्याचे हित पाहून घ्यावा. माझे याबाबत काही म्हणणे नाही असे मत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. माळेगावच्या गाळप हंगामाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले, वाढलेल्या ऊस उत्पादनामुळे बहुतांश साखर कारखान्यांनी विस्तारीकरण केले आहे. शेजारील सोमेश्वर, छत्रपती साखर कारखाना, माढा, फलटण तसेच साखरवाडी येथील साखर कारखान्यांनी विस्तारीकरण केले आहे. माळेगाव साखर कारखान्याचे झालेले विस्तारीकरण, उपलब्ध उसाची आकडेवारी लक्षात घेता माळेगाव कारखान्याला अधिकच्या उसाची गरज भासणार आहे.

तसेच परिसरातील कारखान्यांच्या झालेले विस्तारीकरण पाहता भविष्यात त्या परिसरातून ऊस मिळेलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे सोमेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात परंतु माळेगाव कारखान्याच्या नजीक असलेल्या दहा गावांचा समावेश करावा अशी एक धारणा आहे. तथापि याबाबत माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांचे मत तसेच कारखान्याचे हित याचा विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे. याबाबत माझे काही म्हणणे नाही असे सांगून कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन पवार यांनी केले.

माळेगाव साखर कारखाना बारामती तालुक्यात येत असल्याने येथील शेतकरी सभासदांनी मला मते दिली आहेत. त्यांच्या माध्यमातून मी खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. अशावेळी मी या शेतकरी बांधवांची कधीही प्रातरणा करणार नाही. मी कधीच कारखान्याच्या कामकाजात लुडबुड करत नाही. कारखान्याच्या बाबतीत राज्य तसेच देश पातळीवर काही अडचणी असतील तर त्या मी जरूर सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे माळेगाव साखर कारखान्याचे सभासद हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांचे नुकसान होईल असे कृत्य माझ्याकडून घडणार नाही अशी भावनिक तळमळ पावर यांनी व्यक्त केली.

माळेगावने उच्चांकी दर द्यावा…
माळेगाव साखर कारखान्याच्या 66 व्या गळीत हंगामाची सुरुवात माझ्या हस्ते करण्यात आली आहे. परंतु कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाला सांगू इच्छितो की माळेगावच्या सभासदांना उच्चांकी ऊस दर मिळाला पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले. निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button