विमाननगरमध्ये ड्रेनेज ‘ओव्हरफ्लो’; नागरिकांना दुर्गंधीचा त्रास | पुढारी

विमाननगरमध्ये ड्रेनेज ‘ओव्हरफ्लो’; नागरिकांना दुर्गंधीचा त्रास

पुणे; पुढारी वृत्तसेवा: विमाननगरमधील आनंद विद्यानिकेतन रस्त्यावरील ड्रेनेज तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. वर्दळीच्या रस्त्यावरून वाहणार्‍या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक हैराण झाले असून, खड्ड्यांमुळे रस्त्यावर सांडपाण्याची डबकी तयार झाली आहेत. त्यातून वाट काढताना पादचार्‍यांसह वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. विमाननगर परिसरातील कैलास सुपर मार्केटसमोरील हा रस्ता मुख्य रस्ता असून, या ठिकाणी नेहमी वर्दळ असते.

लोहगाव, टिंगरेनगर, विश्रांतवाडी येथून येणारी वाहने या रस्त्याने सम्राट चौकमार्गे नगर रस्त्याकडे मार्गस्थ होतात. सध्या रस्त्यावरील तीन ड्रेनेज तुंबले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून दुर्गंधीयुक्त पाण्याचे लोट वाहत आहेत. या रस्त्यांवर बहुतांश ठिकाणी खड्डे पडले असून, त्यांमध्ये हे पाणी साचून राहत आहे. या रस्त्याने ये-जा करणार्‍या वाहनचालक तसेच पादचार्‍यांच्या अंगावर डबक्यातील पाणी वाहन गेल्याने उडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

जवळपास आठवडाभरापासून हीच परिस्थिती कायम असल्याने नागरिकांची मोठी गैरयोय होत आहे. प्रशासनाला खड्डे बुजविण्यासाठी वेळ नसेल, किमान ड्रेनेजमधून वाहणारे सांडपाणी तरी प्रशासनाने बंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत माजी नगरसेवक राहुल भंडारे म्हणाले की, नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत पालिकेच्या संबंधित खात्याला निवेदन दिले आहे. त्यावर प्रशासनाने या ठिकाणची पूर्ण लाइन बदलावी लागणार असल्याचे सांगितले. सध्या या ठिकाणी काम सुरू आहे. मात्र, ते जलद गतीने पूर्ण करून प्रशासनाने नागरिकांची यातून लवकरात लवकर सुटका करण्याची
आवश्यकता आहे.

Back to top button