पुणे : हम बेवफा हरगीज ना थे ,पर हम वफा कर ना सके ! म्हणत खा. सुप्रिया‌ सुळे यांचा भाजपवर निशाना | पुढारी

पुणे : हम बेवफा हरगीज ना थे ,पर हम वफा कर ना सके ! म्हणत खा. सुप्रिया‌ सुळे यांचा भाजपवर निशाना

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी “हम बेवफा हरगीज ना थे! पर हम वफा कर ना सके” या गाण्याच्या माध्यमातून भाजपवर निशाना साधला. भाजपने ठाकरेंसोबतच शिंदे गटाचेही नुकसान केले असून निवडणूक आयोगाचा चिन्ह गोठवण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याची टिका केली.

महापालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या नऱ्हे‌ गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रविवारी खा. सुळे यांनी येथील गोकुळ नगर येथे ‘जनसंवाद’ कार्यक्रम घेतला. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, राज्यकर्ते शिवसेना आणि ठाकरे कुटुंबास‌ त्रास देण्याचे काम करत आहेत. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. भाजपने कट कारस्थान करून “हम बेवफा हरगीज ना थे! पर हम वफा कर ना सके” या गाण्याप्रमाणे शिंदे गटावरही वार केला आहे. आता पक्षाचे नावही नाही आणि चिन्हही नाही. खरे तर भांडण आणि निवडणूक चिन्ह गोठवल्याने दोन्ही गटांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी १९९५-९६ मध्ये चंद्राबाबू नायडू आणि एन.टी. रामाराव यांच्यात मतभेद झाल्यानंतर आंध्रप्रदेशात असाच पेचप्रसंग निर्माण झाला होता. मात्र तेव्हा निवडणूक आयोगाने चंद्राबाबू यांना पक्षीचे चिन्ह दिले होते, असेही‌ त्या म्हणाल्या.

भाजप नेते शिवसेना पक्ष संपला आहे, अशी‌ टिका करत असल्याच्या प्रश्नावर खा. सुळे म्हणाल्या, कोणताही पक्ष आणि विचार कधीही संपत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला असे २०१९ मध्ये बोलले जात होते, तसे झाले नाही. कोणी पक्ष संपला म्हणण्याने काही होत नाही, विचार, पक्ष आणि कार्यकर्ते कधीच संपत नाही. तसे असते‌ तर देशातील‌ सर्वच पक्ष संपले असते. राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी जे भाष्य केले, त्यावर उद्धव ठाकरे यांनी बोलावे, असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याच्या प्रश्नावर खा. सुळे म्हणाल्या, फडणवीस यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहिजे, असे काही नाही. ही काय बोर्डाची परीक्षा नाही. योग्य वेळी उद्धव ठाकरे बोलतीलच. मात्र, फडणवीस जो बोलतात, ते सर्वच खरे असते, असं नसतं, असेही त्या म्हणाल्या.

खा. सुळे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे –

मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे याचे उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी द्यावे.
शिंदे गटाचे लोक कमळ चिन्हावर निवडणूक लढणार का ? हे पहावे लागेल.
जे आज टिका करत आहेत, ते काँग्रेसमध्ये असताना का बोलत नव्हते, पक्षांतर केल्यावर मंत्रीपद मिळाल्यावर का बोलत आहेत.
एक देश एक पक्ष हा आमचा विचार नाही. आम्ही एक देश अनेक पक्ष या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालणारे व विचार करणारे आहोत.
बंडखोरांना फोडण्यासाठी भाजप पक्ष अडीच वर्षापासून प्लॉनिंग करत होता, हे आता चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्यामुळे नाकारता येणार नाही.

Back to top button