पुणे जिल्ह्यातील 221 ग्रा.पं.वर प्रशासकराज | पुढारी

पुणे जिल्ह्यातील 221 ग्रा.पं.वर प्रशासकराज

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज येणार आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींचा समावेश असून, भोर तालुक्यातील 54 ग्रामपंचायती आहेत, तर सर्वांत कमी शिरूर तालुक्यातील केवळ चार ग्रामपंचायतींवर प्रशासक येणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या टप्प्यात सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याआधी पूर्वतयारी म्हणून प्रभागरचना, मतदार याद्यांसाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायती आहेत. मुदत संपेल त्याप्रमाणे प्रशासकांची नियुक्ती करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केली असून, त्यासंदर्भात जिल्हा परिषदेला कळविण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतींची यादी आणि तारखा यांचा आढावा प्रशासनाने घेतला असून, त्यप्रमाणे प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भात कार्यवाही केली जाणार आहे. या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मेअखेर असणारी मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. प्रभागरचनेप्रमाणे मतदार यादीची फोड करून प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाईल.

मुदत संपण्याच्या दिवसापर्यंत ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य कार्यरत राहतील. त्यानंतर प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकार हे जिल्हा परिषदेचे आहेत. प्रशासकांना संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य मंडळाचे अधिकार प्राप्त असतील. प्रशासक नियुक्त करताना तो जिल्हा परिषदेचा कर्मचारी अथवा ग्रामसेवक, ग्राम विस्तार अधिकारी असेल. एका ग्राम विस्तार अधिकार्‍याला दोन किंवा तीन ठिकाणी प्रशासक म्हणून नियुक्त करता येईल.

मुदत संपणार्‍या ग्रामपंचायती भोर तालुक्यात
जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींची मुदत ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत संपणार आहे. त्यात भोर तालुक्यातील 54, वेल्हे 28, दौंड 8, बारामती 13, इंदापूर 26, जुन्नर 17, आंबेगाव 21, खेड 23, शिरूर 4, मावळ 9, मुळशी 11 आणि हवेली तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींचा सामावेश आहे.

Back to top button