पुणे : ज्येष्ठांची ‘लालपरी’जोमात; महिन्यात 2 लाख जणांचा एसटीने मोफत प्रवास | पुढारी

पुणे : ज्येष्ठांची ‘लालपरी’जोमात; महिन्यात 2 लाख जणांचा एसटीने मोफत प्रवास

प्रसाद जगताप
पुणे :‘नमस्कार ओ… तात्या..! कुठं निघालात, इतक्या घाईघाईत..!’ तात्या म्हणतात; ‘संगमनेरला निघालो आहे.’,‘ कशासाठी बरं?’ ‘तंबाखू आणायला’, ‘का इथं मिळत नाही?’ ‘मिळते ना इथंसुद्धा, पण तिकडे कारखाने आहेत, म्हणून स्वस्त मिळते.’, ‘मग जायला खर्च नाही का येणार?’, ‘नाही येणार अजिबात!, कारण शासनाने आमच्यासारख्या 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी फ—ी केली आहे ना, तिथेच निघालोय आता…’ यांसारखे विनोद सध्या सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत असून, एसटी फ—ी असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचेही सध्या घराबाहेर फिरण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास नुकताच मोफत केला आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर 2022 या एकाच महिन्यात एसटीच्या पुणे विभागातून तब्बल 2 लाख 4 हजार 366 ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवास केल्याची नोंद करण्यात आली आहे, तर दररोज बहुतांश ज्येष्ठ नागरिक एसटीने मोफत प्रवास करण्याचा लाभ घेत आहेत. ज्येष्ठांनाही या मोफत सेवेचा फायदा होत असून, ज्येष्ठ नागरिक घरात बसण्याऐवजी आता फिरण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे.

राजगुरूनगर आगारातून सर्वाधिक लाभ
एसटीच्या पुणे विभागातून 2 लाख ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवास केला आहे, तर पुणे विभागातील 13 आगारांपैकी सर्वाधिक राजगुरूनगर येथील आगारातून 35 हजार 662 प्रवाशांनी प्रवास केला आहे.

75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक शासनाच्या या अमृत महोत्सवी योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ घेत आहेत. ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, पुणे विभागातून 2 लाख ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला आहे.

                   – ज्ञानेश्वर रणावरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग

Back to top button