पुणे-पानशेत रस्त्यावर वाहतूक कोंडी; रस्ता खोदून ठेकेदार गायब | पुढारी

पुणे-पानशेत रस्त्यावर वाहतूक कोंडी; रस्ता खोदून ठेकेदार गायब

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: अनेक महिन्यांपासून रखडलेल्या काँक्रिटीकरणासाठी पोलिस, जलसंपदा विभागासह प्रशासनाला न विचारता खडकवासला धरण माथ्यावर रातोरात रस्ता खोदण्यात आला. त्यामुळे मुख्य पुणे-पानशेत रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी सुरू आहे. या वाहतूक कोंडीचा मोठा फटका पर्यटकांसह पानशेत, वरसगाव धरण खोर्‍यासह खानापूर, सिंहगड, पश्चिम हवेली परिसरातील दुग्ध व्यावसायिक, कामगार तसेच विद्यार्थ्यांना बसला आहे. या भागातील एसटी, पीएमपीएमएल बससह खासगी, सरकारी वाहनांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी पाच वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत वाहतूक कोंडीत हजारो नागरिक, अडकून पडले. वरिष्ठ अधिकार्‍यांसह हवेली पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला होता. तरीही वाहतूक कोंडी कायम होती. सिंहगड, पानशेत भागात जाण्यासाठी मुख्य पुणे -पानशेत हा एकमेव रस्ता आहे. सिंहगड, पानशेत अशी पर्यटनस्थळे तसेच लष्करी संस्था, वीज निर्मिती केंद्र अशी अति महत्त्वाची केंद्रे या परिसरात आहेत.

त्यामुळे रस्त्यावर 24 तास पर्यटकांसह हजारो वाहनांची वर्दळ आहे. असे असताना दसरा सणाच्या दिवशी रातोरात खडकवासला धरण माथ्यावरील चौकात ठेकेदाराने एका बाजूचा रस्ता खोदला. दुसर्‍या बाजूला राडारोडा, खड्ड्याचा अरुंद रस्ता आहे. तेथून एकाच वेळी समोरासमोरून वाहनांना ये-जा करता येत नाही. त्यामुळे बस, टेम्पो आदी वाहने दोन्ही बाजूला अडकून वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागत आहेत.

धोकादायक प्रवास
खडकवासला गावापासून धरण चौपाटीपर्यंतचा रस्ता अत्यंत अरुंद आहे. धरण चौकातील अर्धा रस्ता खोदल्याने एका बाजूच्या अत्यंत अरुंद व चिखल खड्ड्यातुन धोकादायक प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मोठ्या दुर्घटनेची भीती निर्माण झाली आहे.

बांधकाम विभागाने न कळवता रातोरात रस्ता खोदला आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे खोदलेला रस्ता बुजवण्याची मागणी केली आहे.
                                                            – सदाशिव शेलार,
                                                  वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हवेली

खडकवासला येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी एका बाजूला रस्ता खोदण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराला वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना केली आहे .
                                                          – ज्ञानेश्वर राठोड,
                                       शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

 

Back to top button