पुणे : प्रेयसीला अद्दल घडविण्यासाठी त्याने लुटला 15 लाखांचा ऐवज! | पुढारी

पुणे : प्रेयसीला अद्दल घडविण्यासाठी त्याने लुटला 15 लाखांचा ऐवज!

पुणे / धनकवडी; पुढारी वृत्तसेवा : परदेशात जाऊन स्टेजशो करणार्‍या नृत्यांगना (रील्स स्टार) असलेल्या प्रेयसीबरोबरचे प्रेमसंबंध दुरावल्यानंतर तिला अद्दल घडविण्यासाठी तिच्या घरी तब्बल साडेचौदा लाखांची घरफोडी करणार्‍या प्रियकराला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने युट्यूबवर चोरी कशी करायची, यासंबंधी व्हिडीओ पाहून घरफोडी केल्याचा प्रकार समोर आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त आर. एन. राजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुमीत बाबू परदेशी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 24 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

सोमवारी (दि. 3) सायंकाळी सव्वासात ते सव्वाआठ वाजण्याच्या दरम्यान ही घरफोडी करण्यात आली आहे. फिर्यादी तरुणीही आंबेगाव बुद्रुक येथे राहण्यास आहे. ती काही कामानिमित्त बाहेर पडली असताना अज्ञात चोरट्यांनी तिच्या घराची कडी उघडून तिच्या घरात प्रवेश केला. या वेळी हॉलमधील पर्समधील सात हजारांची रोकड चोरली. तसेच बेडरूममधील कपाटातील 28.4 तोळ्यांचे दागिने आणि दुबईचे 40 हजार रुपये किमतीचे विदेशी चलन असा तब्बल साडेचौदा लाखांचा ऐवज चोरून नेला हाता.

त्यानंतर तिने तत्काळ भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता व पोलिस अंमलदार यांचे पथक घरफोडीच्या गुन्ह्यात तपास करीत असताना त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले असता 2 ऑक्टोबर रोजी एक संशयित घटनास्थळाकडे जात असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानुसार परदेशीला ताब्यात घेण्यात आले. चौकशी केल्यानंतर सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर गुन्हा कबूल करताना चोरीचा ऐवज काढून दिला. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर तो मासे विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे समजले. त्याने ज्या तरुणीच्या घरी चोरी केली ती त्याची प्रेयसी असल्याचे निष्पन्न झाले. त्याने ती दुसर्‍या व्यक्तीबरोबर बोलत असल्याचा राग मनात धरून घरफोडी केली. पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार गणेश भोसले, नरेंद्र महांगरे, हर्षल शिंदे, सचिन गाडे, राहुल तांबे, विक्रम सावंत, विश्वनाथ घोणे, रवींद्र चिप्पा, धनाजी धोत्रे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली.

कुत्र्याला फिरविण्यासाठी गेल्यानंतर तासाभरात घर साफ
आपल्या प्रेयसीवर पाळत ठेवून असलेल्या सुमीतने फिर्यादी जेव्हा सायंकाळी सव्वासातच्या सुमारास तिच्याकडील कुत्र्याला फिरविण्यासाठी घराबाहेर पडली. त्याने याच संधीचा फायदा उठविला. त्याच्याकडे असलेल्या चावीच्या साह्याने घरात प्रवेश करून त्याने घरफोडी केली. त्याला प्रेयसीने कुठल्या वस्तू कोठे ठेवल्या, याची सर्व माहिती होती. तिने दाखविलेल्या विश्वासाचा त्याने गैरफायदा घेऊन ही घरफोडी केली.

 

Back to top button