इंदापूर : वनीकरणात बाहेरील जनावरांना ‘नो एंट्री’; लम्पीच्या धोक्यापासून वन विभाग सतर्क | पुढारी

इंदापूर : वनीकरणात बाहेरील जनावरांना ‘नो एंट्री’; लम्पीच्या धोक्यापासून वन विभाग सतर्क

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: सध्या लम्पी आजाराने पशुधनावर संकट कोसळले असताना वन्यप्राण्यांना विशेषत: चिंकारा हरणांना याची लागण होऊ नये, यासाठी वन विभाग सतर्क झाला आहे. इंदापूर तालुक्यातील वनीकरणात बाहेरील जनावरांना ‘नो एंट्री’चा निर्णय वन विभागाने घेतल्याची माहिती इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी यांनी दिली. या वनीकरणात प्रसिद्ध चिंकारा हरणाची संख्या सर्वाधिक आहे. त्यांना लम्पी आजाराची लागण होऊ नये, यासाठी पशुवैद्यकीय विभागाच्या सतत संपर्कात राहून वन विभाग खबरदारीच्या उपाययोजना करीत आहे.

लम्पीचा तृणभक्षक वन्यप्राण्यांना धोका ओळखून विशेष खबरदारी घेतली आहे. बाहेरील जनावरांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. इंदापूर तालुक्यात 6,100 हेक्टर क्षेत्र हे वन विभागाने व्यापलेले असून, यामध्ये जवळपास 55 गावांमध्ये हे क्षेत्र विखुरलेले आहे. ज्या गावांमध्ये वनीकरण जास्त आहे, त्या ठिकाणी वन कर्मचार्‍यांकडून पाळीव प्राण्यांची चौकशी केली जात आहे. ग्रामस्थांमध्ये पाळीव जनावरे वन विभागात न आणण्यासाठी वन विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने वनीकरणामध्ये तसाही चराईबंदीचा आदेश लागू आहे.

माळरानाचा राजा
चिंकारा हरीण हे इंदापूरच्या माळरानावरचा राजा म्हणून ओळखले जाते. त्याची उंची साठ ते पासष्ट सेंटिमीटर, तर वजन 20 ते 25 किलोपर्यंत असते. याची हरणातील कुरंग गटात वर्गवारी होते. अत्यंत चपळ, लहान पाय, पिळदार शिंगे असतात. त्यांचा नैसर्गिक शत्रू लांडगा आहे. अत्यंत कमी पाण्याची गरज त्याला लागते. माळावर कळपाने राहते.

त्यांची झुंज पाहण्यासारखी असते. कळस, कडबनवाडी, शेळगाव, गोतोंडी, कौठळी, बिजवडी, सोनमाथा, गोखळी, बाबीर देवाची रुई, या गावांच्या वनात चिंकारा हरणांच्या कळपाचा वावर आहे. त्यांच्या अन्न व पाण्याची सोय वन विभागाने तेवढ्या प्रमाणात केल्याने त्यांच्या अधिवासाला धोका नाही, त्यामुळे त्यांना लम्पी आजाराची लागण होऊ नये, यासाठी वन विभाग काळजी घेत आहे.

Back to top button