पुणे : 637 कर्मचारी रात्रभर कार्यरत; राडारोडा उचलण्यासाठी लागले दहा तास | पुढारी

पुणे : 637 कर्मचारी रात्रभर कार्यरत; राडारोडा उचलण्यासाठी लागले दहा तास

पुणे; पुढारी वृत्तसेवा: चांदणी चौकातील पूल नियंत्रित स्फोटाने पाडण्यात आला. परंतु, स्फोटानंतर त्याचा सांगडा तसाच उभा दिसत होता. त्यामुळे पूल पडला नसल्याची टीका सुरू झाली. परंतु, अपेक्षेप्रमाणेच पूल जमीनदोस्त झाल्याचा दावा संबंधित कंपनीकडून करण्यात आला. पुलाचा राडारोडा उचलण्यासाठी दहा तासांचा वेळ लागला.

राडारोडा उचलण्यासाठी 16 एक्सकैवेटर, चार डोझर, चार जेसीबी, 30 टिप्पर, दोन ड्रिलींग मशिनचा वापर करण्यात आला. मिशन चांदणी चौक फत्ते करण्यासाठी 637 अधिकारी, कर्मचारी आणि कामगार रात्रभर जागले. रविवारी (दि.2) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास स्फोट करण्यात आला. मात्र, संपूर्ण पूल पडला नाही. पुलाचा केवळ मध्यभाग पडला आणि दोन्ही बाजूचा भाग तसाच राहिला. त्यावर स्फोट करणारे आनंद शर्मा म्हणाले, ‘ज्या वेळी हा पूल बांधण्यात आला.

त्या वेळेस त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टीलचा वापर केला गेला. आम्हाला त्या स्टीलचा अंदाज आला नाही. त्यामुळे स्फोटानंतर पुलाचा काही भाग शिल्लक राहिला.’पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण 210 कर्मचारी काम करीत होते. सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलिस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलिस दलातर्फे एकूण 3 पोलिस उपायुक्त, 4 सहायक आयुक्त, 19 पोलिस निरीक्षक, 46 सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक, तसेच 355 पोलिस कर्मचारी असे एकूण 427 पोलिस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

उंच बांधकाम (व्हर्टिकल स्ट्रचर) आणि समांतर बांधकाम (हॉरिझंटल) या पाडण्याच्या प्रक्रिया वेगळ्या असतात. दिल्लीतील बांधकाम उंच होते. ती पाडण्याची पद्धत वेगळी होती. चांदणी चौकातील पूल समांतर असल्याने त्यात स्टील रॉड खूप होते. त्यामुळे हा पूल पाडताना किंचित विलंब झाला. हे काम अंत्यत जोखमीचे होते.

                                           – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पुणे.

Back to top button