पुणे : ‘बीआरटी’तील घुसखोरीला बसणार चाप; अपघात रोखण्यासाठी खासगी वाहनांवर कारवाई | पुढारी

पुणे : ‘बीआरटी’तील घुसखोरीला बसणार चाप; अपघात रोखण्यासाठी खासगी वाहनांवर कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील बीआरटी मार्गांवरील घुसखोरी रोखण्यासाठी आता पीएमपी प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून, वाहतूक पोलिसांच्या मदतीने पीएमपीने घुसखोरी करणार्‍या वाहनांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी येरवडा-वाघोली बीआरटी मार्गावर वाहतूक पोलिस आणि पीएमपी अधिकार्‍यांनी घुसखोरी करणार्‍या एसटी महामंडळाच्या बससह खासगी वाहनांवर कारवाई केली.

पीएमपी प्रशासनाचे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात 7 बीआरटी मार्ग आहेत, तर आणखी एक बीआरटी मार्ग प्रस्तावित आहे. याच बीआरटी मार्गांमध्ये खासगी वाहनचालक सारखेच घुसखोरी करत असल्याचे पीएमपी प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अनेकदा या बीआरटी मार्गांवर अपघातदेखील झाले आहेत, या पार्श्वभूमीवर येथे होणारे अपघात रोखण्यासाठी आणि खासगी वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी बीआरटी मार्गावर आता वाहतूक पोलिसांच्या सहाय्याने खासगी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे पीएमपीचे बीआरटी व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले.

अशी झाली दंडात्मक कारवाई…
पीएमपी प्रशासन आणि वाहतूक पोलिस संयुक्तपणे बीआरटी मार्गावर घुसखोरी करणार्‍यांवर कारवाई करत आहेत. यात विमाननगर वाहतूक विभागाच्या वतीने बीआरटी मार्गात घुसखोरी करणार्‍या 1 हजार 540 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे, तर पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाच्या वतीने जानेवारी ते जुलै 2022 या कालावधीत 3 हजार 494 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याद्वारे 18 लाख 84 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे खासगी वाहनचालकांनी बीआरटी मार्गात घुसखोरी करू नये, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अत्याधुनिक यंत्रणा असलेले 148 बूम बॅरिअर
पुणे व पिंपरी-चिंचवड येथे असलेल्या बीआरटी मार्गांमध्ये दिवसेंदिवस खासगी वाहनचालकांची घुसखोरी वाढत आहे. ती रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा असलेले 148 बूम बॅरिअर बसविण्याचे नियोजन केले आहे.

Back to top button