कुरकुंभ : फिरंगाई मंदिर परिसरात महिला चोरट्यांची टोळी सक्रिय | पुढारी

कुरकुंभ : फिरंगाई मंदिर परिसरात महिला चोरट्यांची टोळी सक्रिय

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा: श्री फिरंगाई मंदिर परिसरात चोरी करणार्‍या महिलांची टोळी सक्रिय झाली आहे. या चोरट्या महिलांनी दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण चोरून नेले आहे. चोरीचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. श्री फिरंगाई देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. मंदिरात धार्मिक विधी, पूजा नियमित होत असल्याने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मंदिर व्यवस्थापनाकडून दर्शनासाठी सोय केली आहे. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. असे असले तरी काही चोरट्या महिला व पुरुष मंदिर  परिसरात वावरत असून, गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करीत आहेत.

शुक्रवारी (दि. 30 सप्टेंबर) पाचव्या माळेला मनोहर बोरकर, मुलगा पीयूष व पत्नी ज्योती बोरकर (रा. कुरोली, ता. शिरूर) हे दर्शनाला आले होते. यादरम्यान बोरकर जिथे जाईल तिथे त्याच्या मागे अज्ञात तीन महिला फिरत होत्या. पालखीचे दर्शन घेताना ज्योती बोरकर यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण या महिलांनी चोरून नेले. या चोरीचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. या चोरीच्या घटनेमुळे भाविकांनी काळजी घेणे गरजेचे झाले आहे. याबाबत शनिवारी (दि. 1 ऑक्टोबर) फिर्याद देण्यासाठी गेलो होतो. मात्र, उशिरापर्यंत कुरकुंभ पोलिस मदत केंद्रात कोणी हजर नव्हते. त्यामुळे दौंड पोलिस ठाण्यात गेलो. तिथे फिर्याद न घेता कुरकुंभला जाण्याचा सल्ला देण्यात आला, असे बोरकर यांनी सांगितले.

Back to top button