एकवीरा देवी मंदिर परिसर विकासासाठी 39 कोटी मंजूर | पुढारी

एकवीरा देवी मंदिर परिसर विकासासाठी 39 कोटी मंजूर

कार्ला : आगरी, कोळी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मावळातील आई एकवीरा देवी मंदिर व लेण्यांचे जतन, संवर्धन व विकास करण्यासाठी सुमारे 39 कोटी 43 लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मागील अनेक दिवसांपासून आमदार सुनील शेळके निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करत होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानमंडळाच्या सन 2020 च्या हिवाळी अधिवेशनात आभाराच्या भाषणात केलेल्या घोषणेनुसार व 23 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारने प्राचीन मंदिरे, लेण्यासंवर्धन करण्याबाबत बृहत विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते.

राज्यातील 8 प्राचीन मंदिरांचे होणार जतन त्यानुसार, राज्यातील 8 प्राचीन मंदिरांचे जतन, संवर्धन व परिसर विकास करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आगरी-कोळीबांधवांचे कुलदैवत असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी मंदिराचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. 2021-22 च्या अर्थसंकल्पात सुमारे 101 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी मावळातील कार्ला येथील आई एकवीरा देवी मंदिर व लेणी जतन, संवर्धन व परिसर विकास करण्यासाठी सुमारे 39 कोटी 43 लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे.

आगामी काळात रोप वे, भक्तनिवास व आवश्यकतेनुसार भौतिक सोयीसुविधांसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
– सुनील शेळके, आमदार

Back to top button