पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी; राज्यातील आरक्षण जाहीर | पुढारी

पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी; राज्यातील आरक्षण जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्हा परिषदेसह राज्यातील नऊ जिल्हा परिषद अध्यक्षांचे पद हे सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाले आहे. राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर केले आहे. राज्यातील 34 जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. या सोडतीत जाहीर झालेल्या आरक्षणाची अंमलबजावणी ही जिल्हा परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीनंतर होणार्‍या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून केली जाणार आहे.

हे आरक्षण अडीच वर्षे कालावधीसाठी असणार आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे खुले झाले आहे. पाच वर्षाच्या कालखंडानंतर पुणे जिल्हा परिषदेचे आगामी अध्यक्ष हे खुल्या गटातून निवडले जाणार आहेत. माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर यंदा पहिल्यांदाच हे पद खुले झाले आहे.

ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा, प्रभाग रचनेचा मुद्दा, राज्यातील सत्तांतर व त्यानंतरची बदललेली राजकीय स्थिती त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. पुढील एक ते दोन महिन्यांत राज्यात निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Back to top button