दौंड तालुक्यात आणखी तीन गुर्‍हाळांवर कारवाई | पुढारी

दौंड तालुक्यात आणखी तीन गुर्‍हाळांवर कारवाई

केडगाव; पुढारी वृत्तसेवा: दौंड तालुक्यातील गुर्‍हाळांमध्ये गूळ बनविताना करण्यात येणार्‍या गैरप्रकारांवर आणि त्यामुळे मानवी जीवनाला असलेल्या धोक्यावर प्रकाशझोत टाकल्यावर जाग आलेल्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) आता या गुर्‍हाळांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे, ही कारवाई केवळ नावापुरती न राहता त्यातून काहीतरी निष्पन्न व्हावे, अशीच लोकांची अपेक्षा आहे.
तीन दिवसांपूर्वी बोरीपार्धी (ता. दौंड) गावातील गूळ गुर्‍हाळघरांवरील कारवाईनंतर अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी (दि.30) दापोडी आणि हंडाळवाडी परिसरातील तीन गुर्‍हाळांवर कारवाई केली आहे.

खराब साखर- चॉकलेट आणि प्लास्टिक कागद उकळताना व्हिडिओ आणि छायाचित्रेही या वेळी पथकाने काढली. सकाळी साडेनऊ वाजता दाखल झालेल्या पथकाने पहिली कारवाई सचिन गूळ उद्योग येथे अर्चना झाझुरने यांनी केली. या ठिकाणी प्लास्टिक वितळून गुळात मिक्स करणारी छायाचित्रे, फोटो आणि व्हिडिओ काढला आहे. अत्यंत घातक असणारी गूळ बनविण्याची प्रक्रिया मानवी जीवनाला हानिकारक असल्याचे त्यांनी सांगितले. या गुर्‍हाळाचे मालक गणेश साहेबराव मोहिते असून ते दापोडी गावचे रहिवासी आहेत, त्यांच्याच मालकीचे दुसरे गुर्‍हाळ सुपरस्टार गूळ उद्योगावरही कारवाई करण्यात आली आहे.

या ठिकाणी क्रांती बारवकर यांनी कारवाई केली. उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. तिसरी कारवाई समर्थ गूळ उद्योगावर शुभांगी कर्णे यांनी केली आहे. या उद्योगाचे मालक अमोल गणपत मेमाणे आहेत, ते हंडाळवाडी येथील रहिवासी आहेत. मेमाणे यांच्याकडे खराब साखरेचा ट्रॅक्टर ट्रॉली भरून साठा मिळाला आहे. तालुक्यात जवळापास सातशेहून अधिक गुर्‍हाळांची संख्या आहे. या आठवड्यात या विभागाने आजच्या कारवाईसह चार ठिकाणी कारवाई केली आहे. केडगाव परिसरात सर्वाधिक संख्याने गुर्‍हाळे आहेत, त्यांच्यावर कारवाईचा सपाटा सुरू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एफडीएने हा मोठा दणका गुर्‍हाळमालकांना दिला आहे.

Back to top button