बाणेर येथे वृक्षतोड; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

बाणेर येथे वृक्षतोड; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

बाणेर : मुख्य रस्त्यावरील आरोग्य केंद्राशेजारील महापालिकेतर्फे लावण्यात आलेली 5 ते 6 पूर्ण वाढ झालेली झाडे तोडण्यात आली आहेत. साधारण सहा ते सात वर्षांपूर्वीच्या या झाडांची तोड करण्यात आल्यामुळे परिसरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी रोष व्यक्त केला. बाणेर आरोग्य केंद्राशेजारील अनधिकृत टपरीधारकांनी व हॉटेल व्यावसायिकांनी ही वृक्षतोड केली आहे. तसेच बाणेर रस्त्यावरील अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने व्यावसायिक वृक्षतोड करत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

मुख्य रस्त्यावर महापालिका व ‘स्मार्ट सिटी’तर्फे झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे तोडणार्‍यांवर प्रशासन कारवाई करत नसल्याचे पर्यावरणप्रेमी नागरिकांनी सांगितले. या बाबतीत उद्यान विभागाचे अधिकारी रवींद्र कांबळे यांनी सांगितले की, प्रशासनाने या वृक्षतोडीला कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. या झालेल्या वृक्षतोडीची पाहणी करून पंचनामा करण्यात आला असून, यासंदर्भात परिसरातील व्यावसायिकांना लवकरच नोटीस बजावली जाईल.

Back to top button