पुणे; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ महिला व तिच्या मुलाला जेवणातून गुंगीचे औषध देऊन कपाटातील रोख रक्कम चोरी करणाऱ्या घरकामगार महिलेला वानवडी पोलिसांनी तामिळनाडू येथून अटक केली आहे.
शांती चंद्रन (वय ४३, रा. तिरुवअण्णा मलाई, तामिळनाडु) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी एका ६० वर्षाच्या महिलेने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.ही घटना ८ ऑगस्ट रोजी रात्री १० ते ९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्यांच्या सुमारास घडली.
या प्रकरणी पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडीतील सोपानबाग येथील मिटटाऊन सोसायटीत एक ६० वर्षांची महिला आपल्या मुलासह राहते.त्यांच्याकडे शांती चंद्रन ही महिला घरकाम करीत होती.घरकाम करण्यासाठी तिने आपले बनावट मराठी नाव सांगितले होते.
तिने ८ ऑगस्ट रोजी रात्रीच्या जेवणातून फिर्यादी व त्यांच्या मुलाला गुंगीचे औषध दिले होते. त्यांना गुंगी आल्यावर कपाटात ठेवलेले ९ हजार ५०० रुपये चोरी करुन नेले होते.त्यानंतर ती तामिळनाडुला आपल्या गावी पळून गेली होती.
वानवडी पोलिसांनी तामिळनाडू येथे जाऊन तिला पकडले.सहायक पोलिस निरीक्षक जयवंत जाधव तपास करीत आहेत.