पुणे : आईच्या प्रियकराकडून मुलीने उकळली खंडणी

पुणे : आईच्या प्रियकराकडून मुलीने उकळली खंडणी
Published on
Updated on

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : आईच्या प्रियकाराकडून मुलीने तिच्या मित्राच्या मदतीने खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार शहरात समोर आला आहे. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे प्रत्येक महिन्याला एक लाखाची खंडणी देताना संबंधीत मुलगी आईच्या प्रियकरासोबत असायची. तिने आईला व तिच्या प्रियकराला पैसे देऊन हे प्रकरण मिटविण्याचा सल्ला देखील दिला होता. मात्र पोलिसांच्या नजरेतून तिचा बनाव सुटू शकला नाही. अखेर प्रकरणाचा छडा लावत मुख्य सुत्रधार मुलीसह तिच्या मित्राला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या.

मिथून मोहन गायकवाड (वय 29, रा. कुरबावी, ता. माळशिरस) आणि कर्वेनगर परिसरातील (21 वर्षीय) तरूणी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांचा एका फरार साथीदाराचा शोध सुरू आहे. आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली. याबाबत एका (42 वर्षीय) व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईसोबत प्रेमसंबध ठेवणार्‍या व्यक्तीला धडा शिकविण्यासाठी…

आईसोबत प्रेमसंबध ठेवणार्‍या व्यक्तीला धडा शिकविण्यासाठी त्याचे व्हीडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून मुलीने मित्रांच्या मदतीने 15 लाखांची खंडणी मागितली होती. मुलीला आईच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. आल्यानंतर मुलीनेच व्हॉट्स ॲप हॅक करून फोटो मिळवून पाठविल्याचे समोर आले आहे. व्यवसायिकाने बदनामीच्या भीतीने 2 लाख 60 हजार रूपये दिले. पण, सतत होणार्‍या त्रासाला कंटाळून त्याने गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेतली. त्यानंतर सापळा रचून संशयीत आरोपी मिथून गायकवाड याला अटक केल्यानंतर या प्रकरणात महिलेच्या मुलीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा बिल्डींग साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. मे महिन्यात त्यांना दोन व्यक्तींचा फोन आला होता. सुरुवातीला त्यांनी बिल्डींग बांधकाम साहित्याबाबत चौकशी केली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दोघेजण दुकानात आले. त्यांनी साहित्याची चौकशी करत होते. त्यावेळी एकाने अचानक शिवीगाळ करत तुझे एका महिलेच्या संबंधाचे फोटो त्यांच्याकडे असल्याचे सांगितले. सॅकमधून काही तरी काढत त्यांच्या पोटाला लावले. त्यांनानंतर कारमध्ये बसवून अलंकार पोलिस चौकीजवळ घेऊन गेले.

व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

कारमध्ये मारहाण करून तुझे एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत असे म्हणत सर्व माहिती काढून घेतली. फिर्यादीचा मोबाईल हिसकावून घेत त्यामधील फोटो व व्हिडीओ घेतले. ते व्हडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन 15 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे नाही दिले तर तोंड दाखविण्यास जागा ठेवणार नाहीत. तसेच, महिण्याला एक लाख व आठ महिन्यानंतर सर्व पैसे द्यायचे, असे धमकाविले. या घटनेनंतर फिर्यादी यांनी सर्व माहिती महिलेला सांगितली. तसेच, त्यांना घाबरू न जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर महिलेने हा सर्व प्रकार त्यांच्या मुलीस सांगितला. त्यानंतर संशयीत आरोपींनी महिलेच्या मुलीस फोन करून फिर्यादी यांना एक लाख रूपये घेऊन कात्रज परिसरात येण्यास सांगितले. असे दोन वेळा संशयीत आरोपींनी दोन लाख रूपये घेतले. यासाठी फिर्यादींनी त्यांच्याकडी गाडी देखील विक्री केली.

मात्र आरोपींचा पैशासाठी तगादा लावल्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्यांनी खंडणी विरोधी पथकाला तपास करण्याचे आदेश दिले. निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक निरीक्षक संदीप बुवा यांनी फिर्यादी यांच्या सांगण्यानुसार तपासाला सुरूवात केली. त्यावेळी त्यांना सुरूवातीला मुलीवरच संशय आला होता.

तांत्रिक विश्लेषनाद्वारे तिची गोपणीय माहिती काढली असता ती सुरुवातीपासूनच संशयीत आरोपीच्या संपर्कात असल्याचे समोर आले. मात्र पोलिसांनी अतिशय सावधपने काम करत तिला पत्ता लागू दिला नाही. संशयीत आरोपींचा राहिलेले पैसे मागण्यासाठी फोन आल्यानंतर पहिल्यांदा डेक्कन परिसरात सापळा रचला. पण, संशयीत आरोपींनी त्या ठिकाणी पैसे न घेता दगडूशेठ गणपती मंदिर परिसराजवळ पैसे घेतले. त्यानंतर संशयीत आरोपी गायकवाड याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तरुणीच्या सांगण्यावरून हा सर्व कट रचल्याचे उघडकीस आले.

प्रेमसंबंधाचा सुगावा अन् व्हॉट्स अ‍ॅप केले हॅक

फिर्यादी व्यवसायिक आणि संशयीत आरोपी तरुणीच्या आईचे प्रेमसंबंध असल्याची माहिती तिला मिळाली होती. त्यामुळे तिने आईचे व्हॉटस्अ‍ॅप हॅक करून सर्व फोटो काढून घेतले. त्यानंतर ते फोटो मित्र गायकवाड याला पाठविले. सुरुवातीला फिर्यादीला धडा शिकवायचा असे ठरले होते. मात्र त्यांनी फिर्यादींना बदनामी करण्याची धमकी देत 15 लाखाच्या खंडणीची मागणी केली. खासगी क्षणातील फोटो मिळाल्यानंतर गायकवाड याने मित्राच्या मदतीने फिर्यादींना धमकिवण्यास सुरूवात केली. त्यांच्याकडून 2 लाख 60 हजार रुपये उकळले.

गायकवाडने फेडले कर्ज तर तरुणीने केली शॉपींग

आईच्या प्रियकराकडून काही रक्कम उकळल्यानंतर संशयीत आरोपी गायकवाड याने मिळालेल्या पैशातून कर्ज फेडले तर तरुणीने शॉपींग केली. गायकवाड व तरुणीचे मागील पाच सहा वर्षापासून प्रेमसंबध आहेत. गायकवाड हा विवाहीत आहे. तरी देखील त्यांच्यात प्रेमसंबंध होते. तरूणी बीबीएच्या दुसर्‍या वर्षाला शिकते. फिर्यादी यांना खंडणीची मागणी संशयीत आरोपी हे त्यांच्या मैत्रिणीच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरून करत होते.

त्यामुळे फिर्यादी खूपच घाबरले होते. संशयीत आरोपी तरुणीने तिची आई दोन क्रमांक वापर होती. त्यापैकी एक क्रमांकाचे आरोपीच्या मोबाईलवर व्हॉट्स ऍप सुरू करून दिले होते. त्यावरून संशयीत आरोपी फिर्यादी यांना फोन करत होते. फिर्यादींचा व्यवसाय लहान आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मोठी रक्कम नव्हती. संशयीत आरोपींनी त्यांच्याकडे 15 लाखांची खंडणी मागितल्यामुळे बदनामीच्या पोटी काही पैसे दिले. गाडी विकल्यानंतर पुढील महिन्यात पैसे देण्यासाठी त्यांची बुलेट गहाण ठेवल्याचे समोर आले आहे. पैसे देण्यास उशीर झाला की संशयीत आरोपी त्यांना मारहाण करत होते. त्यामुळे त्यांनी खूपच धसका घेतला होता.

पैसे देताना तरुणी प्रत्येक वेळी सोबत

प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्यांतर तरुणीने संशयीत आरोपींना पैसे देऊन हे प्रकरण मिटविण्याचा सल्ला आईलाच दिला होता. आईचा प्रियकर जेव्हा संशयीत आरोपींना पैसे देण्यासाठी जात असे तेव्हा तरुणी देखील सोबत असायची. प्रत्येक महिन्याचा तारखेला पैसे मागण्यासाठी संशयीत आरोपींचा फोन देखील तरुणीच्या मोबाईलवरच येत असे. त्यामुळे पोलिसांच्या नजरेत तरुणी आली होती. त्यानुसार पोलिस तिच्यावर नजर ठेवून होते. तांत्रिक विश्लेषनात ती सुरूवातीपासूनच संशयीत आरोपी गायकवाड यांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. तेव्हापासून पोलिसांचा संशय तिच्यावर बळावला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news