पुणे ; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी महापालिकेतील चक्क स्थायी समितीचा अध्यक्ष आणि दोनच दिवसांत पुणे महापालिकेतील एका अभियंत्याला लाचप्रकरणी अटक करण्यात आली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) होणारी मोठी खाबूगिरी चव्हाट्यावर आली.
गेल्या आठ महिन्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांत तब्बल 147 जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) यशस्वी ट्रॅप टाकून अटकेची कारवाई केली आहे. तर, मागील 32 महिन्यांमध्ये राज्यात एकूण 555 जणांवर एसीबीने यशस्वी सापळे टाकले आहेत.
विकासकामांच्या मंजुरीपासून त्यांची बिले निघेपर्यंत सर्वच बाबतीत टक्केवारी बोकाळली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून एखादा दाखला मिळवायचा असेल, तरी सामान्य नागरिकांचे पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. विविध सेवा पुरवण्यासाठीही मोठ्या प्रमाणात लाच स्वीकारल्याचे कारवायांच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे.
यशस्वी सापळ्यांचा विचार करता आठ महिन्यांत राज्यात सर्वाधिक 124 यशस्वी सापळे महसूल, भूमी अभिलेख, नोंदणी विभागात; तर त्यापाठोपाठ पोलीस खात्यात 104 व त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेत मोठ्या प्रमाणावर सापळे टाकण्यात आले.
महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका हे सर्व मिळून 147 यशस्वी सापळे टाकले आहेत. यामध्ये 4 वर्ग 1 अधिकारी, 13 वर्ग 2 अधिकारी, वर्ग 3 अधिकारी 77, क्लास फोर मधील 11, इतर लोकसेवक व खासगी व्यक्ती 42 जणांचा समावेशआहे.
चालू वर्षाच्या आठ महिन्यांचा विचार करता लाचेच्या प्रकरणांमध्ये लाच स्वीकारण्यात पुणे विभाग सर्वात आघाडीवर आहे. वेगवेगळ्या 35 विभागांत हे ट्रॅप यशस्वी ठरले आहेत. यामध्ये दोन अपसंपदेचीही प्रकरणे असून, त्यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई 52, ठाणे 91, नाशिक 118, नागपूर 61, अमरावती 64, औरंगाबाद 130 तर नांदेड 59 जणांवर ट्रॅप टाकण्यात आला आहे.
पुणे विभागातील स्वराज्य संस्थांमध्ये 20 महिन्यांत जिल्हा परिषदेत (पंचायत समिती, ग्रामपंचायत) 4, नगरपरिषदेत 2, पुणे महापालिकेत 3 तर पिंपरी-चिंचवड महापालिकेत 1 असे एकूण 10 ट्रॅप यशस्वी ठरले आहेत. यात अॅड. लांडगे यांच्यावर झालेल्या कारवाईचाही समावेश आहे. चालू वर्षातील 7 ट्रॅपचा यामध्ये समावेश असून मागील वर्षी 3 सापळे यशस्वी ठरले होते.
* 32 महिन्यांमध्ये 555 जणांवर यशस्वी सापळे
* पुणे विभागात दहा ट्रॅप
* लाच स्वीकारणारे एसीबीच्या रडारवर
आमच्याकडे एखादा तक्रारदार आला तरी आम्ही त्याला ज्याच्याविरुध्द तक्रार द्यायची आहे, त्याचे नाव देखील विचारले जात नाही. एसीबीकडून निष्पक्षपणे थेट कारवाई करण्यात येते. लाचेसंदर्भात काही तक्रार असल्यास तुम्ही थेट एसीबीशी संपर्क साधू शकता.
– राजेश बनसोडे, पोलिस अधीक्षक, एसीबी