पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा सहकारी बँक : पीडीसीसी संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची (सन 2020-2025) प्राथमिक मतदार यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे.
या निवडणुकीसाठी एकूण 8 हजार 900 सभासदांपैकी 5 हजार 396 ठराव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी अ, ब, क आणि ड वर्गातील 7 हजार 235 संस्था सभासदांपैकी केवळ 3 हजार 731 संस्थांचेच (51.56 टक्के) ठराव प्राप्त झालेले आहेत, तर 3 हजार 504 संस्थांचे ठराव प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे निवडणुकीतील मतदानाचा टक्का घसरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बँकेच्या ड वर्गातील संस्थांचे ठराव कमी आल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. जिल्हा बँकेच्या एकूण सभासदांतील अ वर्गातील 1 हजार 314 पैकी 1 हजार 304, ब वर्गातील 114 पैकी 97, क वर्गातील 1 हजार 616 पैकी 845, ड वर्गातील 4 हजार 191 पैकी 1 हजार 485 सभासदांचेच मतदानाचे ठराव प्राप्त झाले आहेत.
तर व्यक्ती सभासदांतील सर्व म्हणजेच 1 हजार 665 व्यक्ती मतदान यादीत आहेत. म्हणजे एकूण 8 हजार 900 पैकी 5 हजार 396 संस्थांचे ठराव जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्यांकडे प्राप्त झाले आहेत. 3 हजार 504 संस्थांचे ठराव अप्राप्त असल्याने त्यांना मतदानात सहभाग घेता येणार नाही.
थकबाकीदार संस्था सभासद 33 असून अवसायनातील व नोंदणी रद्द झालेल्या संस्थांची संख्या 206 आहे. म्हणजे अशा 239 संस्थांचा निर्णय आक्षेप, हरकती व सूचनांवर अवलंबून राहील. बँकेच्या निवडणुकीत थकबाकीदार सभासदांना मतदानाचा अधिकार नाही. ड वर्गातील सुमारे 2 हजार 706 संस्था आणि क वर्गातील 771 संस्थांचे मतदानाचे ठराव आले नाहीत.
जिल्हा बँकेची प्राथमिक मतदार यादी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक (पुणे शहर), जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण), जिल्हा बँक मुख्यालय आणि तालुका स्तरावर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी संगीता डोंगरे यांनी यापूर्वीच दिल्या आहेत.
जिल्हा बँकेसाठी अ वर्ग गटातून प्रामुख्याने विकास सोसायटी मतदारसंघातून 13 संचालक निवडून येतात. जिल्ह्यातील 13 तालुक्यांतून प्रत्येकी एक याप्रमाणे हे उमेदवार आहेत.
ब वर्गातून 1 उमेदवार असून त्यामध्ये कृषी पणन संस्था, शेतमाल प्रक्रिया संस्था, खरेदी-विक्री संघ, सहकारी साखर कारखाने, ऑईल मिल्स, सूतगिरण्या आदींचा समावेश आहे. क वर्गातून 1 जागा आहे. त्यामध्ये नागरी सहकारी बँकांचा समावेश आहे.
ड वर्गातून 1 संचालक आहे. त्यामध्ये अ, ब, क या पोट विभागांपैकी कोणत्याही एका विभागात न मोडणार्या ग्राहक संस्था व इतर बँका, पाणीपुरवठा, गृहनिर्माण, औद्योगिक प्रक्रिया, औद्योगिक उत्पादन संस्था, पगारदार-नोकरांच्या संस्था, सर्वसाधारण संस्था, दुग्ध संस्था, पशुपैदास, वराहपालन, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन प्रतिनिधी व व्यक्ती सभासद प्रतिनिधींचा समावेश आहे.
पाच संचालकांच्या जागा राखीव आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती सदस्य 1, इतर मागासवर्गीय 1, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गीय सदस्य 1, महिला प्रतिनिधी 2 मिळून एकूण 21 संचालक निवडून येतात.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रारूप मतदार यादी शुक्रवारी (दि.3) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्यांकडे 13 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्यात येतील. प्राप्त आक्षेपांवर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी 22 सप्टेंबर रोजी निर्णय देतील. 27 सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी पसिद्ध केली जाईल.
– बी. टी. लावंड , विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे.
हे ही वाचलं का?