पुणे : इनकम टॅक्सचे अधिकारी असल्याचे सांगून सराफाला लुटले; नऊ जणांची टोळी जेरबंद | पुढारी

पुणे : इनकम टॅक्सचे अधिकारी असल्याचे सांगून सराफाला लुटले; नऊ जणांची टोळी जेरबंद

पुणे/कात्रज पुढारी वृत्तसेवा : (इनकम टॅक्सचे अधिकारी असल्याचे सांगून सराफाला लुटले) अक्षय कुमारचा मागील काही वर्षापूर्वी ‘स्पेशल 26’ नावाचा हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमामध्ये बोगस अधिकार्‍यांची 26 जणांची टीम अधिकारी असल्याचे सांगून श्रीमंतांच्या घरावर छापा टाकून लुटमार करत होती. पुण्यात असाच काही धक्कादायक प्रकार घडला असून सराफाला हेरून इनकम टॅक्सचे अधिकारी असल्याचे सांगून 300 ग्रॅम सोने, 20 लाखांची रोकड असा 33 लाख 38 हजारांचा ऐवज दरोडा टाकून लुटणार्‍या 9 जणांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी कोल्हापूर येथून सिने थरार पद्धतीने बेड्या ठोकतात्यांच्या ‘स्पेशल 26’ च्या सारख्या गुन्ह्याला ‘शंभरी’ स्टाईलने दणका दिला आहे.

यांच्यावर गुन्हा दाखल

मुख्य आरोपी त्यावरून व्यास गुलाब यादव (वय 34, रा, जांभूळवाडी, मूळ रा. बिहार), श्याम अच्युत तोरमल (वय 31, रा. धनकवडी), किरण कुमार नायर (रा. भोसरी), मारुती अशोक सोळंके (वय30), अशोक जगन्नाथ सावंत (वय 31, दोघेही रा. माजलगाव बीड), उमेश अरुण उबाळे (वय 24, रा. भोसरी), सुहास सुरेश थोरात (वय 32, मूळ रा. कराड), रोहित संभाजी पाटील (वय 23, रा. चर्‍होली, मूळ गाव- कोल्हापूर) आणि भैय्यासाहेब विठ्ठल मोरे (रा. चर्‍होली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सहायक आयुक्त सुषमा चव्हाण आणि वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, गुन्हे निरीक्षक संगिता यादव उपस्थित होते. याप्रकरणात नंदकिशोर कांतीलाल वर्मा (41, रा. क्षितिज सोसायटी, जांभुळवाडी, दत्तवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकिशोर वर्मा यांचा सराफी व्यावसायीक आहेत. गुन्ह्यातील मुख्य आरोपी व्यास यादव हा त्यांचाच व्यावसायिक मित्र होता. यादव यानेच श्याम तोरमलच्या साथीने या गुन्ह्याचा कट जंगली महाराज रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये रचला. इन्कम टॅक्स अधिकारी भासावे, यासाठी चांगल्या ‘फॉर्मल’ कपड्यांची खरेदी केली. 26 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वर्मा त्यांच्या घराबाहेर यादवसोबत गप्पा मारत उभे होते.

यादव वगळता उर्वरित आठ आरोपी एका कारमधून तेथे आले. त्यांनी वर्मा यांना पाहताच त्यांना आपली ओळख इनकम टॅक्सचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांना तुम्ही अनधिकृतपणे घरात सोन्याचा व्यवसाय करता. प्राप्तिकर भरत नाहीत. त्यामुळे तुमच्यावर ‘रेड’ टाकण्याची ऑर्डर आहे, असे आरोंपी सांगितले. त्यानुसार त्यांनी वर्मा यांना त्यांनी त्यांच्या लॅपटॉप वरून प्राप्तिकर बुडवल्याचे काही फॉर्म दाखविले.

त्यांनंतर घरात झडती घेऊन 20 लाख रुपये रोख आणि 30 तोळे सोन्याच्या नथी स्वतःच्या ताब्यात घेऊन लगबगीने हा मुद्देमाल सील करून स्वत:कडे ठेवला. तसेच व्यावसायिकालाही चौकशीच्या बहाण्याने गाडीत बसण्यास सांगून त्यांना कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ नेऊन सोडले. हा संपूर्ण प्रकार रात्री साडेनऊ ते मध्यरात्री सव्वापर्यंत चालला. त्यांनी लागलीच त्यांच्या सीएशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. सीएला आरोपींच्या कृत्याबद्दल शंका आल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

असा झाला गुन्हा उघड…

तक्रारदार व्यावसायिक भारती विद्यापीठ पोलिसांत गेले, तेव्हा आरोपी व्यास यादव हा देखील त्यांच्यासोबत गेला होता. दरम्यान, तपासादरम्यान यादव याचा गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी यादवकडे चौकशी केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर, यादवने गुन्ह्याची कबुली दिली.

सिने थरार स्टाईल अटक…

व्यास यादवकडे चौकशी केल्यानंतर आरोपी कोल्हापूरला असल्याची माहिती मिळाली. भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक जग्गनाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंकुश कर्चे, अंमलदार रवींद्र भोसले, रवींद्र चिप्पा, सचिन पवार, गणेश शिंदे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, गणेश शेंडे, सचिन गाडे, शिवदत्त गायकवाड, यांच्या पथकाने सापळा रचला. आरोपी हे कोल्हापूर येथील मुरगुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत देवगड-निपाणी महामार्गावर थांबले असल्याचे त्यांना समजले.

काही आरोपी त्यांना बाहेरच सापडले, त्यातील एक आरोपी उसात पळून जात असताना त्याला पकडले. तर दोन आरोपी गाडीमध्ये पळून जात असताना त्यांनी पोलिस कर्मचार्‍याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. हर्षल शिंदे आणि शिवदत्त गायकवाड गाडीला लटकले. तर अभिजित जाधव आणि विक्रम सावंत यांनी गाडीच्या काचेवर जोरदार प्रहार करून काच फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण पकडले गेले. आरोपींना पकडताना पोलिस अंमलदार हर्षल शिंदे आणि शिवदत्त गायकवाड हे जखमी झाले.

आरोपींत तीन सॉफ्टवेअर इंजिनिअर

अटक केलेल्या आरोपींमधील तीन जण सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भैय्यासाहेब मोरे, रोहित पाटील आणि शाम तोरमल हे तिघे इंजिनिअर आहेत. आरोपी मारुती सोळंके अणि अशोक सावंत हे बीड येथील माजलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी आहेत. दोघांनाही त्या खुनाचा खटल्याचा न्यायालयीन खर्च भागवात यावा यासाठी कटात सहभागी झाले होते.

हे ही वाचलत का :

कोरोना उपचारावरील वाढता खर्च : मेडिक्लेमचे काय आहेत पर्याय?

Back to top button