येरवडा परिसरामध्ये स्वच्छतागृहांची दुरवस्था, नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी | पुढारी

 येरवडा परिसरामध्ये स्वच्छतागृहांची दुरवस्था, नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी

येरवडा, पुढारी वृत्तसेवा: परिसरातील लक्ष्मीनगरमधील विविध ठिकाणची सार्वजनिक स्वच्छतागृहे दुरवस्थेमुळे बंद आहेत, तर काही ठिकाणची अर्धवट अवस्थेत सुरू आहेत. लक्ष्मीनगर येथील जयशक्ती मित्रमंडळाशेजारील सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था झाल्याने नागरिकांची मोठी परवड होत आहे.

या स्वच्छतागृहात असलेल्या आठ ब्लॉकपैकी फक्त एकच ब्लॉक सुरू आहे. या स्वच्छतागृहाची आउटलेट 2008 पासून बदलली नसल्याने ती सर्व नादुरुस्त झाली आहेत. यामुळे हे स्वच्छतागृह तुंबून आहे. यामुळे परिसरातील महिलावर्ग, तसेच ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. या स्वच्छतागृहाची दारेही तुटलेल्या अवस्थेत आहे. तसेच, आतमधील फरशांचीसुद्धा दुरवस्था झाली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील अधिकार्‍यांकडे वेळोवेळी तक्रार केली. मात्र, प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. स्वच्छतागृहाचे तुटलेले दरवाजे अंगावर पडून नागरिक जखमी होत आहेत. या स्वच्छतागृहाची दुरूस्ती न केल्यास येरवडा क्षेत्रीय कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

याबाबत वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अनिल ढमाले म्हणाले, ‘स्वच्छतागृह दुरुस्तीबाबत कनिष्ठ अभियंता यांच्याशी बोलणे झाले असून, लवकरच पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल.’

Back to top button