‘योजनांच्या अंमलबजावणीस कार्यशाळेचा उपयोग’, चिंचवड येथे आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेचा समारोप | पुढारी

‘योजनांच्या अंमलबजावणीस कार्यशाळेचा उपयोग’, चिंचवड येथे आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेचा समारोप

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : स्वच्छता व स्वच्छ पाणीपुरवठाबाबत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. गेल्या दोन दिवसांत राष्ट्रीय कार्यशाळेच्या माध्यमातून या विषयावर ऊहापोह झाला. त्याचा उपयोग योजनांच्या अंमलबजावणी व जनजागृतीसाठी करता येईल. संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2015 मध्ये 17 गोल निश्चित केले आहेत. सन 2030 पर्यंत ती आपल्याला साध्य करायची आहेत, त्यासाठी पंचायतींचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंचायतीराज मंत्रालय भारत सरकार व ग्रामविकास आणि पंचायतराज विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित जलसमृद्ध व स्वच्छ गाव राष्ट्रीय कार्यशाळेचा समारोप मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला.

या वेळी दृकश्राव्य माध्यमाद्वारे त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील अध्यक्षस्थानी होते. पंचायतीराज भारत सरकारचे सचिव सुनील कुमार, ग्रामविकास व पंचायतराज विभाग महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार हेही उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “स्वच्छता व स्वच्छ पाणीपुरवठा या विषयावर आयोजित कार्यशाळा महाराष्ट्रात होत असल्याचा आनंद आहे. या कार्यशाळेत ग्रामस्वच्छता व शुद्ध पाणी याचा जो ऊहापोह झाला, त्याचा अंमलबजावणी व जनजागृतीसाठी उपयोग करता येईल. सन 2022 -23 पासून देशात व महाराष्ट्रात शाश्वत विकास योजनांची अंमलबजावणी होऊ घातली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2015 मध्ये सतरा गोल निश्चित केले आहेत. सन 2030 पर्यंत आपल्याला ती साध्य करायची आहे. यासंबंधीच्या करारावर सही करणारा भारत हा मुख्य देश आहे, म्हणून आपले योगदान महत्त्वाचे ठरणार आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विकास आराखडे व लोकसहभागातून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करता येऊ शकेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले की, “आपल्या स्वप्नातले गाव प्रत्यक्षात आणायचे असेल, तर प्रत्येक गोष्टीत सरकारवर अवलंबून राहण्याची मानसिकता सोडावी लागेल. विकास करायचा असेल तर प्रथम स्वतः योगदान द्यावे लागेल. समर्पण वृत्तीने काम करावे लागेल. माझा काय फायदा, यापेक्षा माझ्या गावाला, पर्यावरणास काय फायदा होईल याचा विचार केला तर आपले गाव हरित, सुंदर होऊ शकेल, मोठ्या प्रमाणात निधी हवा असेल तर गावाने व पंचायतीने चांगले काम करणे अपेक्षित आहे,” असे पाटील म्हणाले.

Back to top button