शिवगंगा खोर्‍यात लम्पीचा शिरकाव; लसीकरण मोहिमेला जोरदार सुरुवात | पुढारी

शिवगंगा खोर्‍यात लम्पीचा शिरकाव; लसीकरण मोहिमेला जोरदार सुरुवात

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा: शिवगंगा खोरे वगळून सर्व ठिकाणी लम्पी या जनावरांच्या आजाराने विळखा घातला होता; मात्र आता या आजाराने शिवगंगा खोर्‍यातही शिरकाव केला असून, पशुपालक धास्तावलेले दिसून येत आहेत. काही दिवसांपासून लम्पी आजाराचा शिरकाव शिवगंगा खोर्‍यातील जनावरांना होऊ नये यासाठी खोर्‍यातील जनावरांना लसीकरण मोहीम सुरू केली होती. मात्र कासुर्डी खे.बा. (ता. भोर) येथील एका गायीला शुक्रवारी (दि. 23) लम्पी आजाराचे निदान झाले.

त्यामुळे शिवगंगा खोर्‍यातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर लम्पीची माहिती मिळाल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण यांनी तत्काळ त्या जनावरावर उपचार केले असून शनिवार(दि. 24)पासून शिवगंगा खोर्‍यातील वेळू, शिंदेवाडी, ससेवाडी, गाउडदरा, कासुर्डी व गोगलवाडी या गावांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे भोर तालुका लघू पशुचिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. प्रशांत सोनटक्के यांनी सांगितले. दरम्यान आजपर्यंत खबरदारी म्हणून खेड शिवापूर, शिवापूर, श्रीरामनगर, आर्वी, कुसगांव, रांजे या गावातून लसीकरण सुरू असून कोंढणपूर, कल्याण, रहाटवडे या गावातील लसीकरण पूर्ण झाले आहे.

आमच्याकडून खबरदारी म्हणून लसीकरण सुरूच आहे. आत्तापर्यंत शिवगंगा खोर्‍यात लम्पीचा प्रादुर्भाव नव्हता; मात्र तो झाला असल्याने भोरमधील सर्व टीम शनिवारपासून कार्यरत करणार आहे. शिवाय लम्पीची लागण झालेल्या जनावरास विलीगीकरण कक्षात ठेवून त्यावर उपचार सुरू ठेवणार आहे. पशुपालकांनी घाबरून नये तसेच या भागात लसीकरण सुरू ठेवणार असून, निःसंकोचपणे जनावरांना लसीकरण करून घ्यावे.

                                                 – डॉ. प्रशांत सोनटक्के,
                                             सहायक आयुक्त, तालुका लघु पशुचिकित्सालय भोर

Back to top button