रस्त्यांच्या निकृष्ट कामाबद्दल 13 ठेकेदार काळ्या यादीत; पुणे मनपा आयुक्तांचा दणका | पुढारी

रस्त्यांच्या निकृष्ट कामाबद्दल 13 ठेकेदार काळ्या यादीत; पुणे मनपा आयुक्तांचा दणका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरात रस्त्यांची निकृष्ट कामे करणार्‍या 13 ठेकेदारांना सहा महिन्यांसांठी काळ्या यादीत टाकण्याबरोबर व एकूण रस्ते दुरुस्ती कामाच्या रकमेच्या 5 टक्के दंडाची कारवाई महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केली आहे. दरम्यान या रस्त्यांची जबाबदारी असलेल्या 24 अभियंत्यांना प्रत्येकी 15 हजारांचा दंडही केला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यां प्रकरणी महापालिकेने केलेली ही आत्तापर्यंत मोठी कारवाई मानली जात असून, त्यामुळे ठेकेदारांबरोबर अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

चालू वर्षांतील पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर खड्डे पडून त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. यामधील अनेक रस्ते हे तर वर्षभरापूर्वीच करण्यात आलेले आहेत. असे असताना या रस्त्यांवर खड्डे पडल्याने रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अखेर त्यावर महापालिका प्रशासनाने पथ विभागाने केलेले व दोष दायित्व कालावधी शिल्लक असलेल्या 139 रस्त्यांची पाहणी करण्यासाठी मे. इंजिनिअर्स इंडिया लि. या संस्थेची नेमणूक केली होती.

या संस्थेने केलेल्या तपासणीत एकूण 17 रस्त्यांची कामे निकृष्ट झाली असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार या 17 रस्त्यांची कामे करणार्‍या 13 ठेकेदारांकडून संबंधित रस्त्यांची दुरुस्ती करून घेण्याबरोबरच रस्त्याच्या कामाच्या निविदाच्या एकूण 0.5 टक्के अथवा दुरुस्ती खर्चाच्या 5 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करणे व त्यांना एका वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याचा, याशिवाय संबंधित रस्त्यांची जबाबदारी असलेले उपअभियंता व शाखा अभियंता यांच्याही जबाबदारी निश्चित करून त्यांची एक वेतनवाढ रोखण्याचा, अथवा दहा हजार रुपये दंड लावण्यासंबंधीच्या कारवाईच्या शिफारशींचा प्रस्ताव शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी आयुक्त कुमार यांच्याकडे मंजुरीसाठी ठेवला होता.

त्यावर आयुक्तांनी 13 ठेकेदारांना सहा महिन्यांसाठी काळ्या यादीत टाकण्याबरोबर प्रशासनाने सुचविलेली दंडात्मक कारवाई करण्यास आणि संबंधित 24 अभियंत्यांना प्रत्येकी 15 हजारांचा दंड आणि संबंधित कार्यकारी अभियंत्यांना सक्त ताकीद देण्याच्या कारवाईवर गुरुवारी शिक्कामोर्तब केला. त्यामुळे रस्त्यांची निकृष्ट कामे करणार्‍या ठेकेदारांना आणि त्यांच्याकडे काणाडोळा करणार्‍या अभियंत्यांना हा मोठा दणका मानला जात आहे.

कारवाई झालेले ठेकेदार
1) दीपक कन्स्ट्रक्शन 2) धनराज अस्फाल्ट 3) एस.एस. कन्स्ट्रक्शन 4) योगेश कन्स्ट्रक्शन 5) शुभम कन्स्ट्रक्शन 6) देवकर अर्थमूव्हर्स 7) विनोद मुथा 8) गणेश इंटरप्राजेस 9) सनशाईन कन्स्ट्रक्शन 10) यू. आर. फॅसिलिटी 11) श्रेयश कन्स्ट्रक्शन 12) आदर्श भारत एनव्हायरो प्रा. लि. 13) पेव्हवे कन्स्ट्रक्शन

Back to top button