पिंपरी : शहरामध्ये महिनाभरात डेंग्यूची रुग्णसंख्या दुप्पट | पुढारी

पिंपरी : शहरामध्ये महिनाभरात डेंग्यूची रुग्णसंख्या दुप्पट

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये गेल्या महिनाभरात डेंग्यूची रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. अ‍ॅागस्ट महिन्यात 36 बाधित रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत सप्टेंबरमध्ये दुपटीने रुग्णसंख्या वाढली आहे. गेल्या 21 दिवसांत जवळपास 71 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, सांगवी-समतानगर येथील एका डेंग्यू संशयित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या डेंग्यूने डोके वर काढले आहे. शहरात जून महिन्यापासून डेंग्यूचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. जून महिन्यात सुरुवातीला केवळ 299 संशयित आणि 17 बाधित रुग्ण होते. अ‍ॅागस्ट महिन्यात संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या 902 वर जाऊन पोहोचली. तर, 36 बाधित रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबर महिन्यात गेल्या 21 दिवसांतच दीड हजारापेक्षा अधिक म्हणजे 1515 संशयित रुग्णांची नोंद आहे. तब्बल 71 बाधित रुग्ण आढळले आहेत. म्हणजे डेंग्यू रुग्णांची संख्या महिनाभरातच दुपटीने वाढली आहे.

सांगवीत संशयिताचा मृत्यू
सांगवी-ममतानगर येथे 36 वर्षीय तरुणाचा संशयित डेंग्यू आजाराने मृत्यू झाला आहे. त्याच्यावर औंध येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 4 तारखेला त्याला औंध येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर, 16 तारखेला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याला अन्य आजारदेखील होते.

सांगवीमध्ये डबक्यात साचले पाणी
सांगवी- समतानगर येथील गल्ली क्रमांक दोनच्या पाठीमागे एका खासगी बांधकाम व्यावसायिकाचे बांधकाम सुरू आहे. तेथील जागेत पाण्याचे मोठे डबके तयार झाले आहे. त्यामध्ये गवतही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा साठलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. या डबक्याचा त्रास सीएमई कॉलनी आणि समतानगर येथील नागरिकांना होत आहे. तरी, महापालिकेने याचा गांभीर्याने विचार करून त्याचा कोणालाही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी विनीत भोर यांनी केली आहे.

सांगवी येथील तरुणाचा मृत्यू संशयित डेंग्यूने झाला आहे. त्याबाबत आम्ही तपासणी करत आहोत. संबंधित रुग्णाला अन्य आजारदेखील होते. औंध येथील खासगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झालेला आहे. शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढल्याने त्यासाठी आवश्यक दक्षता आम्ही घेत आहोत. आरोग्य विभागाच्या मदतीने डेंग्यू डासाच्या अळ्या तपासून परिसरात धूरफवारणी (फॉगिंग) व अन्य उपाययोजना केल्या जात आहेत.
                        – डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी

महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगवी परिसरात फवारणी करावी. साठलेल्या डबक्यातील पाणी काढण्यासाठी खासगी व्यावसायिकाला नोटीस पाठवून परिसर स्वच्छ ठेवण्याची ताकीद द्यावी. डेंग्यू आजाराबाबत महापालिका आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन जनजागृती करावी.
                  – अण्णा जोगदंड, शहराध्यक्ष, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती.

 

Back to top button